मुंबई, दि. 1 : आपत्कालीन परिस्थितीमध्ये शासनाकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांबाबत जनसंपर्क अधिकाऱ्यांनी अचूक माहिती वेळेत प्रसारित करणे आवश्यक असते. आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रत्येक संस्थेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याची भूमिका महत्त्चाची असून, सर्व संस्थांच्या अधिकाऱ्यांत परस्पर समन्वय असावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक चंद्रशेखर ओक यांनी आज येथे केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनायाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापनाबाबत शासनाचे विविध विभाग, महामंडळे, प्राधिकरणे यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ओक बोलत होते. यावेळी माहिती संचालक (प्रशासन) देवेंद्र भुजबळ, माहिती संचालक (वृत्त व जनसंपर्क) शिवाजी मानकर, राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर, विधानसभा अध्यक्षांचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, विधानमंडळाचे जनसंपर्क अधिकारी सुनील झोरे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
ओक पुढे म्हणाले की, आपत्कालीन परिस्थितीमध्ये माध्यमांना आवश्यक ती माहिती वेळोवेळी दिली पाहिजे. तसेच शासकीय यंत्रणा व माध्यमे यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी जनसंपर्क अधिकारी यांनी विशेष प्रयत्न करावे. आपत्कालीन परिस्थतीमध्ये गरज भासल्यास संबंधित यंत्रणेचे सहकार्य घेऊन प्रसार माध्यमांद्वारे नागरिकांशी संवाद साधून माहिती घ्यावी. वृत्त वाहिन्या व वृत्तपत्रांत सकारात्मक माहिती प्रसृत करण्यासाठी सर्व माध्यमे, यंत्रणांचा वापर करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. विविध संस्थांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांमध्ये समन्वय राहावा यासाठी परिषद घेण्यात येईल, असे .मानकर यांनी सांगितले. भुजबळ यांनीही मनोगत व्यक्त केले.
मुंबई शहरात 6 जून 2016 पूर्वी नाले सफाई आदी उपाययोजना पूर्ण करण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये महानगरपालिकेच्या वतीने 24 अधिकाऱ्यांचे पथक सतर्क राहणार आहे. तसेच एकाच वेळी 70 लाख एसएमएसद्वारे नागरिकांशी संपर्क साधण्याची यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. तसेच संपर्क साधण्याच्या सर्व यंत्रणांसह ‘हम रेडिओ’ च्या माध्यमातून संपर्क साधण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे मुंबई महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी विजय खबाले यांनी सांगितले.
महावितरणकडून मान्सूनपूर्व कामे पूर्ण होत असून मुंबई व्यतिरिक्त राज्यात पावसाळ्यामध्ये वीज पुरवठा नियमित राहील यासाठी विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे, असे महावितरणचे सहमुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल कांबळे यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत विविध संस्थांच्या अधिकाऱ्यांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये करावयाच्या उपाययोजनांसाठी केलेल्या नियोजनाची माहिती दिली. विधीमंडळाच्या वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्या वतीने राज्यातील विविध संस्थांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय परिषद घेण्यात येईल, असे विधीमंडळाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment