प्रसारमाध्यमांच्या गाड्या फोडल्या - सात जण ताब्यात
मुंबई : ओला आणि उबर या खासगी टॅक्सी सेवांना येत्या २६ जुलैपर्यंत कायद्याच्या कक्षेत आणले नाही तर बंद पुकारू, असा इशारा जय भगवान टॅक्सी-रिक्षा चालक मालक महासंघाने मंगळवारी दिला आहे. आजाद मैदानात मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सीचालकांच्या मेळाव्यात महासंघाने हा इशारा दिला आहे. या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले होते.
महासंघाचे अध्यक्ष बाबासाहेब सानप यांनी सांगितले, की ओला, उबर टॅक्सी सेवांवर कायद्याचे नियंत्रण नसल्याने त्यांच्या दरातही तफावत आहे. मीटरनुसार होणाऱ्या रकमेतील काही रक्कम या टॅक्सीचालकांना कंपनीकडून अदा केली जात आहे. त्यामुळे कंपनीकडून पुरवण्यात येणाऱ्या पैशाची चौकशी व्हायला हवी. ही रक्कम काळ्या पैशातून उभी राहत असल्याचा आरोपही सानप यांनी केला आहे. महासंघाच्या कार्यकर्त्यांनी ओला, उबरच्या टॅक्सी म्हणून प्रसारमाध्यमांच्याच गाड्या फोडल्या. काही आंदोलकांनी तर मोबाइलमधील अॅप नष्ट करण्यासाठी स्वत:चा मोबाइल फोडला. एका कॅमेरामॅनला मारहाण झाल्याच्या निषेधार्थ टीव्ही जर्नालिस्ट असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
सात जण ताब्यात
प्रसारमाध्यमांच्या गाड्या फोडल्या प्रकरणी पोलिसांनी सिराज वारीस (३०), रामचंद्र राय (३३), अब्दुल वहाब शेख (३०), अजय जैस्वाल (३०), अनिलकुमार गौर (३४), परमेश्वर जाधव (३०) आणि इम्तियाज खान (४३) या सात जणांना अटक केली आहे. जयभगवान महासंघाचे अध्यक्ष बाबासाहेब सानप यांनी प्रसारमाध्यमांवरील हल्ल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. हल्ला करणारे संघटनेचे कार्यकर्ते नसल्याचा त्यांचा दावा आहे.
No comments:
Post a Comment