मुंबई, दि. 22 : आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्या या नियमानुसार आणि लोकप्रतिनिधींच्या शिफारसपत्रानुसार केलेल्या आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेत्यांनी आरोग्य विभागातील बदल्यासंदर्भात केलेले आरोप तथ्यहीन व बिनबुडाचे आहेत. कोणत्या बदल्या नियमबाह्य केलेल्या आहेत याची त्यांनी उदाहरणे द्यावी आणि केलेले आरोप सिध्द करावे, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे सांगितले.
आरोग्य विभागातील बदल्यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार खुलासा करताना आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी म्हटले आहे की, सन 2016-17 च्या सर्वसाधारण बदल्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी गट-अ संवर्गातील 1101अधिकाऱ्यांचे ऑनलाईन बदलीसाठी विनंती अर्ज प्राप्त झाले होते. त्यांची छाननी केली असता वैद्यकीय अधिकारी गट-अ संवर्गाशिवाय वर्ग-1,गट-ब, अस्थायी व अवैध अर्ज असे एकूण 89 अर्ज प्राप्त झाले होते. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी गट-अ संवर्गातील 1012 अर्ज बदलीसाठी विचाराधीन होते. तथापि त्यामधील 630 वैद्यकीय अधिकाऱ्यांना सध्याच्या पदस्थापनेच्या ठिकाणी तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला होता.
तर 382 अधिकाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या पदस्थापनेवर तीन वर्ष पूर्ण झाली नव्हती. ज्यांच्या पदस्थापनेच्या ठिकाणी तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदलीसाठीची विनंती विचारात घेण्यात आली. त्यामध्ये अधिकाऱ्यांनी आदिवासी भागातील सेवेचा निकष पूर्ण केला आहे का, विनंतीच्या ठिकाणी पद रिक्त आहे का, तेथील अधिकारी बदलीस पात्र आहे का, संबंधितांची शैक्षणिक पात्रता या बाबींचा विचार करुन नियमानुसार नागरी सेवा मंडळाने 270 बदल्यांची शिफारस केली. महाराष्ट्र बदल्यांच्या विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मधील कलम 4(1), 4(2), 4(3) तरतुदीनुसार बदली आदेश निर्गमित करण्यात आले.
गट-अ संवर्गातील बदल्या आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील नागरी सेवा मंडळाच्या शिफारसीनुसार केल्या जातात. गट-ब, क व ड यांच्या बदल्यांचे अधिकार आरोग्य संचालकांना आहे. नियमित बदल्या नसल्यास त्याचे अधिकार आरोग्य विभागाचे राज्यमंत्री यांना आहे.
वैद्यकीय अधिकारी गट-अ संवर्गातील केलेल्या 270 बदल्या या विहित कालावधी पूर्ण केलेले अधिकारी, विनंती नुसार, विधिमंडळ सदस्यांच्या शिफारसीनुसार करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ मध्ये देण्यात आलेल्या पदोन्नती या केवळ एम.बी.बी.एस. अर्हताधारक वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच देण्यात आलेल्या आहेत.
आरोग्य विभागातील बदल्यासंदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जे आरोप केलेले आहे ते तथ्यहीन आणि बिनबुडाचे आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेत्यांनी पुरावे सादर करावेत अन्यथा त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला जाईल,असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment