मुंबई / प्रतिनिधी : २१ जून - सतत दोन दिवसांपासून मुंबईची रेल्वेसेवा कोलमडल्याने मुंबईकरांचे जे हाल होत अाहेत त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई विभागिय अध्यक सचिन अहिर यांनी केला आहे. तसेच एरव्ही रेल्वे संदर्भातील छोट्या मोठ्या उदघाटनांच्या कार्यक्रमांना उठसूट मुंबईत येऊन हजेरी लावणारे रेल्वेमंत्री सुरेश प्रभु सामान्य मुंबईकर अडचणीत असताना नेमके कसे गायब होतात, असा खोचक सवालही त्यांनी यावेळी केला. सोमवार आणि मंगळवार असे सलग दोन दिवस मुंबईकरांची लाईफ लाईन असलेली तिन्ही मार्गांवरची लोकलसेवा कोलमडल्याच्या पार्श्वभुमीवर ते बोलत होते.
एरव्ही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे मुंबईत येऊन लोकलसेवा सुधारण्याबाबतचे विविध सल्ले देत असतात, शिवाय मुंबईच्या प्रत्येक उपनगरीय स्टेशनवर वायफाय सेवा,मुंबईकरांसाठी ई पोर्टल सेवा अशी चकचकीत आश्वासने देणे हा सुद्धा रेल्वेमंत्र्यांचा मोकळ्या वेळेतील छंद आहे. मात्र हे करण्याऐवजी रेल्वेमंत्र्यांनी आता रेल्वेच्या पायाभूत सुविधांकडे लक्ष देण्याची गरज असल्याची अपेक्षाही मा. अहिर यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या खासदारांवरही टीका केली.रेल्वेच्या उदघाटन समारंभांना आपल्या नेत्यांना आमंत्रण नसल्याच्या शुल्लक कारणांवरून रेल्वेमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याच्या बाता करणारे शिवसेनेचे हे खासदार लाेकल सेवा ठप्प झाल्यानंतर मुंबईकरांचे म्हणणे ऐकण्यासाठी साधे फिरकलेही नाहीत. आगामी महापालिका निवडणुकीत अशा बेजबाबदार सत्ताधाऱ्यांना सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय पर्याय नाही, असे आवाहनही त्यांनी यावेळी मुंबईकरांना केले.
No comments:
Post a Comment