मुंबई महानगरपालिकेकडून पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणात नाले सफाई करण्यात येते. महापालिका अधिकारी आणि कंत्राटदर यांच्या साटेलोटयामुळे नालेसफाई करताना कंत्राटदार आणि पालिका अधिकारी अशी काही हात सफाई करतात कि त्याचा परिणाम मुंबईकर नागरिकांना भोगावा लागत असतो. दरवर्षी पाऊस सुरु झाला कि नाले तुंबून मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलेले असते. हे पाणी अनेक ठिकाणी नाल्या बाजूला राहणाऱ्या लोकांच्या घरात घुसून अनेकांचे आर्थिक आणि आरोग्य दृष्ट्या नुकसान करत असते. तसेच पावसाळ्यामध्ये वातावरणात बदल झाल्यामुळेही अनेक आजार होत असतात.
पावसाळ्या दरम्यान ताप, गॅस्ट्रो, टायफॉईड, मलेरि या, डेंगू, लेप्टोस्पायरेसीस व इत्यादी आजार मोठ्या प्रमाणात होत असतात. या आजारांमुळे अनेक लोकांचा मृत्यू झालेला आहे. महानगरपालिकेने आजारांचा सामना करण्यासाठी कंबर कसली असली तरी म्हणावे तसे यश अद्याप आलेले दिसत नाही. दरवर्षी आजारी पडणाऱ्या लोकांच्या संखेत वाढच होताना दिसत आहे. महापालिकेकडून उपाययोजना केली जात असली तरी रुग्णांची संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. यावर पालिकेकडून लोकसंख्या वाढत असल्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याचे कारण दिले जात आहे. पालिकेकडून दिले जाणारे कारण न पटणारे आहे. काही वर्षापूर्वी मलेरियाने रुग्ण दगावत होते मागील वर्षापर्यंत डेंग्यूमुळे रुग्ण मृत्यू पडल्याची पालिकेची आकडेवारी सांगत आहे.
मुंबई महानगरपालिकेकडून करोडो रुपये खर्च करून बँनर, पोस्टर लावली जातात, पत्रके वाटली जातात. वृत्तपत्रात वृत्तवाहिनी, रेडीओवर जाहिरातीसाठी करोडो रुपये खर्च केले जातात. परंतू या जाहिरातींचा म्हणावा तसा उपयोग होत नसल्याने महापालिकेचे करोडो रुपये व्यर्थ जात असताना नागरिकांनाही याचा उपयोग होत नसल्याचे दिसत आहे. महापालिका करोडो रुपये योग्य प्रकारे खर्च करत असती तर पावसाळ्यातील आजारांची जनजागृती होऊन पावसाळ्यात आजारी पडणाऱ्या रुग्णांची संख्या नक्कीच कमी झाली असती. परंतू पावसाळ्यात याउलट परिस्थिती असल्याचे पालिकेकडून मिळणाऱ्या आकडेवारी वरून दिसते. जनजागृती पेक्षा रुग्णालयात करण्यात येणाऱ्या उपचारामुळे रुग्ण बरे होतात यामुळे जनजागृतीच्या जाहिरातीसाठी केला जाणारा खर्च रुग्णांवर चांगले उपचार करण्यासाठी खर्च करायची गरज आहे.
महापालिकेने कुठे आणि किती पैसा उडवावा याचा विचार करण्याची गरज आहे. जाहिराती करताना चुकीच्या ठिकाणी करोडो रुपये खर्च होतात का याचीही चौकशी करण्याची गरज आहे. महापालिकेच्या जनजागृतीच्या जाहिरातींचे ऑडीट होणे गरजेचे आहे. असो महापलिकेने नुकतीच पावसाळ्यापूर्वीची आढावा बैठक घेतली आहे. या बैठकीत पावसाळ्यात लेप्टोस्पायरेसीस आजार होत असल्याची चर्चा करण्यात आली. लेप्टोचा आजार जनावरांपासून होत असल्याने तबेला मालकांना स्वच्छता राखण्याच्या नोटीसा देण्यात आल्याचे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी पत्रकारांना सांगितले आहे. तबेल्यांमुळे जर आजार पसरत असतील तर असे तबेले मुंबई बाहेर हलवण्याच्या मागणीकडे मात्र पालिका आणि सत्ताधारी दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.
मुंबई मध्ये लेप्टो पसरण्याचे आणखी एक कारण म्हणजे मुंबईमध्ये असलेला उंदरांचा सुळसुळाट. मुंबईत रस्त्यावरच नव्हे तर रुग्णालये, कार्यालये, इमारती अश्या सर्वच ठिकाणी उंदरांचा सुळसुळाट झाल्याचे दिसून येतो. उंदीर मारणाऱ्यांची संख्या कमी असल्याने आणि मुंबईमध्ये स्वच्छता ठेवली जात नसल्याने उंदरांची संख्या वाढत चालली आहे. रुग्णालयात उंदीर रुग्णांना चावल्याची चर्चा आहे. यामुळे उंदरांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी पालिका आता एका उंदराला मारण्याचे १० रुपये देणार आहे अशी माहिती पालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष प्रशांत कदम यांनी दिली आहे. उंदीर मारण्यासाठी लोकांची नियुक्ती केली जाणार असून लोकांनी यासाठी पुढे यावे असे आवाहन कदम यांनी केले आहे.
महापालिकेच्या केईएम, नायर आणि शीव रुग्णालयांसह अन्य १६ रुग्णालयांत साथीच्या आजारांची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी २ हजार ८०० खाटांची सोय उपलब्ध असणार आहे. यात ५६० खाटा ताप, ६३ मलेरिया, १९ डेंग्यू, १२० गॅस्ट्रो, २४ टायफॉईड रुग्णांसाठी तर उर्वरित ३० टक्के खाटा इतर आजारांवरील रुग्णांसाठी आरक्षित आहेत, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण विभागाच्या प्रमुख डॉ. मिनी खेतरपाल यांनी पत्रकारांना दिली आहे. महिला व पुरुष रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय, ‘नो फ्लोअर बेड पॉलिसी’ ही संकल्पना राबवण्यात येत असल्याने कोणत्याही रुग्णांवर जमिनीवर उपचार होणार नाहीत, यावर लक्ष ठेवले जाईल. पालिकेची रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्र यातील डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचा-यांना प्रशिक्षणही दिले असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. महापालिका सज्ज असली तरी पालिकेच्या सूचना आणि आवाहना नुसार पालिकेला सहकार्य करत नागरिकांनी आपल्या आरोग्या ची काळजी घेण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३
No comments:
Post a Comment