मुंबई / प्रतिनिधी - मुंबईत जमा होणारा कचरा खुल्या डंपरमधून न नेता बंदिस्त कॉम्पॅक्टरमधून नेण्याचे स्पष्ट निर्देश असल्यामुळे जुन्या डंपरऐवजी ३८ मिनी कॉम्पॅक्टर्स आणि २० मोठे बंदिस्त कॉम्पॅक्टर्स असे एकूण ५८ कॉम्पॅक्टर्स घेण्याचा प्रस्ताव मुंबई महानगर पालिकेच्या घनकचरा विभागाने स्थायी समिती समोर आणला आहे. महापालिकेतून दूर ठेवण्यात आलेल्या अँथोनी मोटर्स कंपनीकडून ही सर्व वाहने खरेदी केली जात असून या माध्यमातून पुन्हा एकदा अँथोनी मोटर्सने महापालिकेत प्रवेश करण्यात येणार आहे.
मुंबई महापालिकेने बंदिस्त वाहने म्हणून कचरा वाहून नेणा-या कॉम्पॅक्टर, मिनी कॉम्पॅक्टर, रिफ्युज डंपर, रिफ्युज टिप्पर अशा वाहनांचा समावेश केला आहे. रिफ्युज टिप्पर हे बंदिस्त वाहन असले तरी या वाहनात कचरा भरण्याचे काम हे कामगारांमार्फत होत असल्यामुळे या वाहनांऐवजी बंदिस्त मोठय़ा कॉम्पॅक्टर्सची खरेदी करण्यात येत आहे.
या जुन्या रिफ्युज टिप्परऐवजी २० कॉम्पॅक्टर्सची खरेदी केली जाणार आहे. यासाठी ८ कोटी ५९ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ही २० वाहने अँथोनी मोटर्सकडून खरेदी करण्यात येत आहेत. याशिवाय शहर व दोन्ही उपनगरांसाठी कार्यरत असलेली कचरा गोळा करण्यासाठी व वाहतुकीसाठी वापरण्यात येणा-या डंपर प्लेसर वाहनांचे आठ वर्षाचे आयुष्य समाप्त झाल्यामुळे त्यांच्याऐवजी मिनी कॉम्पॅक्टर्सची खरेदी केली जात आहे. यासाठी ११ कोटी ६५ लाख रुपये खर्च केले जात आहेत. ही ३८ वाहने ही अँथोनी मोटर्सकडूनच खरेदी केली जाणार आहेत.
या सर्व वाहनांसाठी १ वर्षाचा हमी कालावधी आहे. त्यानंतर पुढील सात वर्षाची देखभालही याच कंपनीकडे राहणार आहे. विशेष म्हणजे महापालिकेत २००४-०५मध्ये अँथोनी मोटर्स कंपनीने प्रवेश केला होता. परंतु पुढे या कंपनीकडून होणारी लूट लक्षात आल्यानंतर या कंपनीला लांबच ठेवण्यात आले होते. त्यामुळे या कंपनीने महापालिकेतून लक्ष काढून अन्य महापालिकेत लक्ष वेधले होते. परंतु आता पुन्हा एकदा अँथोनी मोटर्सने या ५८ वाहनांच्या मदतीने महापालिकेत प्रवेश केला आहे
No comments:
Post a Comment