मुंबई, दि. ८ : योगाचा प्रचार व प्रसार वाढवून महाराष्ट्रात योगमय वातावरण निर्माण व्हावे यासाठी २१ जून २०१६ या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिनासोबतच प्रत्येक महिन्याच्या २१ तारखेला राज्यभर शाळा, महाविद्यालये व विद्यापीठ स्तरावर योगदिन साजरा करण्याबाबतचे निर्देश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे दिले.
राज्यात योग दिन साजरा करण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तावडे बोलत होते. शासनाच्या विविध विभागांमार्फत जिल्हास्तरीय योग दिन समिती स्थापन करुन या समितीने आपआपल्या जिल्ह्यामध्ये वर्षातून एकदा योग महोत्सव साजरा करण्याबाबत नियोजन करावे तसेच जिल्हास्तरीय समितीवर नियंत्रण करणारी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याबाबतचे निर्देशही तावडे यांनी यावेळी दिले. योगाचा प्रचार व प्रसार करणाऱ्या संस्थांनी या कामी सहकार्य करावे असे आवाहनही तावडे यांनी यावेळी केले.
शैक्षणिक आणि महाविद्यालयीन परिसरात योगदिन साजरा करण्यात येणार असून त्यादृष्टीने योग दिनाची जागृती आणि योगसाधना आरोग्य सुदृढ करणारी आणि सर्वसमावेशक असावी अशी जनजागृती करण्याचा मनोदय या बैठकीत व्यक्त करण्यात आला. २१ जून या आंतरराष्ट्रीय योग दिनासोबतच प्रत्येक महिन्याच्या २१ तारखेला राज्यभर शाळा, महाविद्यालये व विद्यापीठ स्तरावर योग दिन साजरा करावा असे तावडे यांनी सांगितले. १२ जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद जयंती निमित्त‘युवक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्यामुळे १२ जानेवारी हा‘युवक दिन’ ते २१ जानेवारी या दरम्यान महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी योग फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येईल. महाराष्ट्रात जिल्हा स्तरावर शाळा, महाविद्यालये, तंत्रनिकेतन,वैद्यकीय महाविद्यालये यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सुमारे ४० हजार गावांपर्यंत योगाचा प्रचार करण्याचे काम या योग फेस्टिव्हलच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे श्री.तावडे यांनी सांगितले. या बैठकीला भारत स्वाभिमान न्यास, पतंजली योग समिती, राज्य योग असोसिएशन, आर्ट ऑफ लिव्हिंग, कैवल्यधाम, समर्थ व्यायाम मंदिर आदी योगाचा प्रचार व प्रसार करणाऱ्या राज्यभरातील संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment