शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही - शिक्षणमंत्री विनोद तावडे
मुबई, दि. १५ : प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळाले पाहिजे, कुठलाही मुलगा शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हेच आमचे उद्दिष्टय आहे असे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज सांगितले.
२०१६-१७ या शैक्षणिक वर्षाचा आज प्रांरभ झाला. आज शाळेचा पहिला दिवस. विदयार्थ्यांसाठी शाळेचा पहिला दिवस चैतन्यमय आणि उत्साहवर्धक व्हावा यासाठी स्वतः शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी २२ शाळाबाह्य मुलांना शाळेत घेऊन गेले आणि शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करुन त्यांच्याशी संवाद साधला.
आज सकाळी तावडे यांनी मंत्रालयाच्या परिसरातील फुटपाथ,मैदान येथे राहणा-या पण शिक्षणापासून वंचित असलेल्या शाळाबाह्य मुलांची भेट घेतली. प्रथम या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने या परिसरातील शाळाबाह्य मुले शोधून काढण्यात आली. शाळेचा गणवेष घातलेल्या मुलांसमवेत त्यांचे पालकही उपस्थित होते. तावडे यांनी त्यांच्या पालकांशीही संवाद साधला. मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या गांधी पुतळ्याजवळच या मुलांसाठी खास शालेय बस फुलांनी सजविण्यात आली होती. तावडे यांनी मुलांना शालेय बस मध्ये चढविले आणि त्यांनी मंत्रालय ते लॉर्ड हॅरिस महानगर पालिका शाळेपर्यंतचा प्रवास शालेय बसमधून विदयार्थ्यांबरोबर केला.
या प्रवासादरम्यान तावडे यांनी शालेय विदयार्थ्यांना खाऊ, फु्गे तर दिलेच पण विदयार्थ्यांना आपण शाळेत असताना करीत असलेल्या गंमती जंमतीही सांगितल्या. यानंतर तावडे यांनी धोबीतलाव येथील लॉर्ड हॅरिस महानगर पालिका उच्च माध्यमिक मराठी शाळेत या शाळाबाह्य मुलांनी नेले आणि तेथे त्या विद्यार्थांचे स्वागत करुन त्यांना त्यांच्या वर्गात नेले. वर्गामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपली शाळेत येण्याची शिक्षणमंत्री तावडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शालेय शिक्षण हा प्रत्येक विदयार्थ्यांचा अधिकार आहे. नवीन शैक्षणिक वर्षात शाळेचा प्रारंभ हा चैतन्यमय आणि उत्साहवर्धक झाल्यास विद्यार्थ्यांना गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळते. त्यामुळेच येणारे पुढील शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांना आनंददायी वाटावे यासाठीच आपण महानगरपालिकेच्या शाळेला भेट दिली आहे. कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून विद्यार्थ्यांनी दक्ष रहावे असे आवाहनही तावडे यांनी यावेळी उपस्थित शिक्षकांना आणि माध्यम प्रतिनिधींना केले.
या मुलांसमवेत शाळेत येताना आपल्याला आनंद होत आहे. विशेष म्हणजे या मुलांच्या चेह-यावर शाळेत येण्याचा आनंद दिसत आहे. शाळेमधील पहिल्या दिवशी गणवेष घालून ही मुले शाळेत जात असून मुलेही फार आनंदित आहेत, असाच आनंद प्रत्येक मुलाच्या चेह-यावर दिसला पाहिजे असेही तावडे यांनी सांगितले.
शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांना अनेक प्रश्नही विचारले. शाळेत अभ्यास करायला आवडतो का ? शाळेत यायचा कंटाळा आला का? शाळेत शिकवलेले समजते का ? शाळेची वेळ योग्य वाटते का ? असे विविध प्रश्न त्यांनी विदयार्थ्यांना विचारले. यानंतर विदयार्थ्यांबरोबर काही कविताही तावडे यांनी म्हटल्या. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत देण्यात येणारे शैक्षणिक साहित्याचे वाटपही यावेळी तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक वर्गही उपस्थित होता.
No comments:
Post a Comment