भाजप व खडसेंमध्ये ‘डील’ झाली! वर्षाअखेरीस खडसे निर्दोष सुटणार - राधाकृष्ण विखे पाटील - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 June 2016

भाजप व खडसेंमध्ये ‘डील’ झाली! वर्षाअखेरीस खडसे निर्दोष सुटणार - राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि. 4 जून 2016:
महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी बडतर्फ करण्याऐवजी त्यांचा राजीनामा घेणे, ही भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये झालेली ‘डील’ असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.


खडसे यांच्या राजीनाम्यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी सरकारवर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले की, भाजप आणि खडसे यांच्यात झालेल्या ‘डील’नुसार, खडसेंनी पक्ष फोडू नये, तूर्तास राजीनामा देऊन पक्षाची अब्रू जाऊ देऊ नये. त्याच्या मोबदल्यात चालू वर्ष संपण्यापूर्वीच खडसेंना सर्व आरोपातून क्लीन चीट देऊन पुन्हा मंत्रिमंडळात सामावून घेतले जाणार आहे, असा आरोप विखे पाटील यांनी केला. एकनाथ खडसेंवर कारवाई केली तर पक्षात फूट पडेल, अशी भीती भाजपला आहे. त्यामुळेच खडसेंचा राजीनामा घेण्यापूर्वी भाजपने विधान परिषद निवडणुकीत मोठ्या खुमखुमीने उतरविलेले दोन उमेदवार प्रसाद लाड आणि अपक्ष मनोज कोटक यांचे अर्ज मागे घेण्यात आले. खडसेंची भीती नसती तर कदाचित भाजपने ही निवडणूक बिनविरोध होऊ दिली नसती, असेही विखे पाटील म्हणाले.

विरोधी पक्षनेत्यांनी यावेळी एकनाथ खडसेंवरही तोफ डागली. काँग्रेसने फक्त आरोप केले; पुरावे दिले नाहीत, या खडसेंच्या विधानाचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. पुरावे म्हणून खडसेंना नेमके काय अपेक्षित आहे? असा प्रश्न उपस्थित करून ते पुढे म्हणाले की, दाऊदशी संभाषण झाले की नाही? याचा पुरावा दाऊदकडून आणायला आमच्याकडे दाऊदचा नंबर नाही. खडसेंकडे नंबर आहे. त्यांनी दाऊदला फोन करून त्यांचे बोलणे झाले नाही, ते जाहीर करायला सांगावे. भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात स्वतः राज्याच्या उद्योग मंत्र्यांनी सांगितले की, ही जमीन एमआयडीसीची आहे. यापेक्षा आणखी मोठा पुरावा काय असू शकतो? राज्यातील कॅबिनेट दर्जाच्या उद्योग मंत्र्यांनी सार्वजनिकपणे दिलेली माहिती हा पुरावा नाही काय? अंबरनाथ येथील जमिनीची किंमत 5 कोटी असताना त्यासाठी 30 कोटींची लाच कशी मागितली जाऊ शकते? असा खडसेंचा दावा आहे. परंतु, काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी महसूल विभागाचीच कागदपत्रे सादर करून या जमिनीची किंमत 226 कोटी रूपये असल्याचे स्पष्ट केले. आता खडसेंना त्यांच्या अखत्यारीत राहिलेल्या विभागाच्या कागदपत्रांवर विश्वास नसेल तर मग कशावर विश्वास आहे? हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे, अशी घणाघाती टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

भाजपवर हल्ला चढवताना ते म्हणाले की, भाजपच्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पक्ष खडसेंच्या पाठीशी असल्याचे सांगितले. पण् काल-परवापर्यंत खडसेंच्या बाजूने टीव्ही चॅनल्सवर बाजू मांडायला पक्षाचे प्रवक्ते तयार नव्हते. परंतु, आता ‘डील’ झाल्यानंतर मात्र भाजप अचानक खडसेंसोबत उभी झाली आहे. हे न कळायला जनता दूधखुळी नाही. या ‘डील’मुळे भाजपची भ्रष्टाचाराबाबत अनास्था उघड झाली आहे. भ्रष्टाचाराविरूद्ध कारवाई करण्याची भाजपची धमक नाही. खडसेंचा राजीनामा हा लोकभावनेचा विजय आहे. हिंमत असेल तर भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या इतरही मंत्र्यांवर भाजपने कारवाई करून दाखवावी, अशीही मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad