एकनाथ खडसेंविरुद्ध `मोक्का' लावा संजय निरुपम यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 June 2016

एकनाथ खडसेंविरुद्ध `मोक्का' लावा संजय निरुपम यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई, ६ जूनः प्रतिनिधी
राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक कारणांवरून केलेली हकालपट्टी स्वागतार्ह आहे. पण केवळ तेवढ्याने भागणार नाही. खडसे यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे सिद्ध झाल्यामुळे त्यांच्याविरोधात `मोक्का' लावा, अशी रोखठोक मागणी मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांना केली.


मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात निरुपम लिहितात, `दोन महिने टाळाटाळ केल्यानंतर अखेरीस आपण खडसे यांना राजीनामा द्यायला लावला हे योग्य झाले. परंतु त्यांच्यावरील अनेक गंभीर आरोपांची चौकशी केवळ उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत करून भागणार नाही. किंबहुना, सरकारचे हे पाऊल त्रोटक असून त्यातून फडणवीस सरकारच्या हेतूंविषयीच शंका उपस्थित होते.'
खडसे यांच्या अनेक लीलांचा पाढाच निरुपम यांनी वाचून दाखवला.`केवळ पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर करून खडसे थांबले नाहीत. त्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे सज्जड पुरावेही हाती आले आहेत. कुख्यात वाँटेड डॉन दाऊद इब्राहीमबरोबर झालेल्या त्यांच्या दूरभाष संभाषणाचे रेकॉर्ड हाती आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याच्या (मोक्का) कलम १०(२) चा भंग केल्याबद्दल त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला गेला पाहिजे,' याकडे निरुपम यांनी लक्ष वेधले.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) पुण्यातील जमीनही खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांनी हडप केली याचा उल्लेख निरुपम यांनी केला. 'अधिकारांचा गैरवापर करून खडसे यांनी एमआयडीसीची ३ एकर जमीन पत्नी आणि जावयाला विकत घेऊन दिली. ४० कोटी रुपये भावाची जमीन अवघ्या ३.७५ कोटी रुपयांत खरीदली गेली. यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. खडसेंची ही कृती म्हणजे भ्रष्टाचार निर्मूलन कायद्याच्या कलम १३ (क, ड, इ)चा भंगच आहे. तेव्हा मी आपणाला विनंती करतो, की अशा कठोर कायद्यांअंतर्गत खडसेंविरुद्ध कारवाई व्हायला हवी. केवळ जुजबी उपाययोजना करून भागणार नाही, कारण ती लोकभावनेशी प्रतारणाच ठरेल.'
भाजपच्या दांभिक नैतिकतावादाचा समाचार घेताना निरुपम लिहितात, `तुमचा भारतीय जनता पक्ष आणि तुम्ही नेहमीच नैतिक शुचितेविषयी आग्रही असता. पण खडसे प्रकरणात मात्र तुमची कृती पुरेशी प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण दिसली नाही. ती उणीव आतातरी भरून काढाल अशी आशा करतो!' असे पत्रात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad