मुंबई, दि. 13 - राज्यात वन महोत्सवानिमित्त1 जुलै रोजी 2 कोटी झाडे लावण्यात येणार आहेत. मुंबई शहर जिल्ह्यामध्येही मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमासाठी विद्यार्थी, नागरिक, स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा आणि या कार्यक्रमाची जनजागृती करावी, असे आवाहन मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी आज केले.
1 ते 7 जुलै दरम्यान आयोजित वन महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दि. 1 जुलै रोजी लावण्यात येणाऱ्या 2 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत श्रीमती जोशी बोलत होत्या. यावेळी विभागीय वन अधिकारी संजय माळी, क्षेत्रीय वन अधिकारी सीमा अडगावकर, सर जे.जे. समूह रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत थोरात यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जोशी म्हणाल्या की, मुंबई शहरातील मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी विविध शासकीय विभागांनी आपल्या कार्यालयाच्या जागेची पाहणी करून कोणती झाडे लावता येतील त्याची माहिती द्यावी. 1 जुलै रोजी या ठिकाणी जास्तीत जास्त झाडे लावण्याचा कार्यक्रम घ्यावा. या कार्यक्रमामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध शाळांचे विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, नागरिक यांना सहभागी करून घ्यावे.
वृक्ष लागवडीच्या या कार्यक्रमासंबंधी तळागाळातील नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी,यासाठी विविध कार्यक्रम घ्यावेत. महानगरापालिकांच्या शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धा घेण्यात याव्यात. तसेच 30 जूनपर्यंत नागरिक व विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरी व वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात यावे. तसेच विविध महाविद्यालये,तीनही मार्गांच्या रेल्वे स्थानके येथे विद्यार्थ्यांचे पथनाट्य आयोजित करावे, जेणेकरून नागरिकांमध्ये वृक्ष लागवडीसंबंधी जागृती निर्माण होईल, असेही श्रीमती जोशी यांनी यावेळी सांगितले.
ज्या नागरिकांना व संस्थांना झाडे हवी असतील, त्यांनी मागणी केल्यास झाडे पुरविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी विविध संस्था,कंपन्यांकडून सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत सहकार्य घेण्यात यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق