मुंबई, दि. ६ - कॉंग्रेसचे नेते गुरुदास कामत यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय आहे. त्यांनी कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील एक दिग्गज नेते म्हणून गुरुदास कामत यांच्याकडे पाहिले जात होते. मुंबईतील महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाच, त्यांनी अचानक राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतल्याने कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
गुरुदास कामत गेल्या कित्येक वर्षांपासून कॉंग्रेसमध्ये होते. त्यांनी उत्तर-पूर्व मुंबई मतदारसंघातून ते खासदार म्हणून १९८४ साली निवडून गेले. त्यानंतर सलग पाच वेळा खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले होते. मात्र २०१४ मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यांनी यूपीएच्या काळात राज्यमंत्री पद भूषविले होते. तसेच मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले होते.
यूपीएमध्ये असताना त्यांनी पक्षातील नाराजी व्यक्त करत आपल्या केंद्रीय राज्यमंत्री मंत्रिपदाचा राजीनामा देऊन खळबळ उडवून दिली होती. त्यावेळी त्यांना कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने नाराज होऊन राजीनामा दिला असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. तसेच, याआधीही २००८ मध्ये मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी थेट दिल्लीला जाऊन कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा दिला होता. परंतु त्यांचा राजीनामा सोनिया गांधी यांनी स्वीकारला नव्हता. त्यावेळी त्यांनी आपल्या कारकीर्दीला पाच वर्षे पूर्ण झाली असून नवीन उमेदवाराला संधी मिळावी म्हणून आपण राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले होते.
No comments:
Post a Comment