मुंबई, दि. 10: ‘सुफी तत्वज्ञान :सखोल विश्लेषण’ या बृहदप्रकल्पास शासनाने प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता दिली असून अहमदनगरचे डॉ. मुहम्मद आजम यांच्यावर या बृहदप्रकल्पाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सुफी तत्वज्ञानाचा प्रारंभिक अवस्थेपासून ते विकास काळापर्यंतच्या दार्शनिक वैशिष्ट्यांचा सर्वंकष सविस्तर आढावा घेऊन भारतीय, पाश्चात्य, इस्लामी आणि सुफी तत्वज्ञान एकत्रित करुन असा बृहदग्रंथ राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत प्रसिध्द करण्यात येणार आहे. हा बृहदग्रंथ विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक यांना उपयुक्त ठरेल.
‘सुफी तत्वज्ञान :सखोल विश्लेषण’ या बृहदप्रकल्पाकरिता आठ लाख रुपये इतक्या खर्चांस प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाचे काम डॉ. मुहम्मद आजम पूर्ण करणार असून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्याबरोबर तसा सामंजस्य करार करणार आहेत. या करारामध्ये कामाचे टप्पे ठरवून प्रकल्पासाठी मंजूर निधीचे टप्पानिहाय विभाजन करण्यात येणार आहे. प्रत्येक टप्प्यासाठी त्या-त्या टप्प्यावरील कामाची पूर्तता झाली आहे याची खात्री करुन प्रकल्प लेखकास निधीचे वितरण करण्यात येणार आहे. करारपत्रामध्ये प्रकल्प आढाव्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात येणार असून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या बैठकीत याबाबत आढावा घेण्यात येणार आहे.‘सुफी तत्वज्ञान :सखोल विश्लेषण’ या बृहदप्रकल्पाची निर्मिती करण्यास सुमारे 15 ते 18 महिन्यांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्याwww.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 201606091300491733 असा आहे.
No comments:
Post a Comment