मुंबई / प्रतिनिधी दि. २१ - जागतिक योगदिनानिमित्त आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वांद्रे येथे पोलिस दलातील जवानांसोबत योगा करून आज योग दिन साजरा केला. मुंबई भाजपा आध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या स्पंदन आर्ट आणि मुंबई पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वांद्रे रेक्लेमेशन येथील प्रोमोनाड परिसरात उभारण्यात आलेल्या १५० फूटी उंच तिरंग्याच्या परिसरात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत योगदिन साजरा करण्यात आला. यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार, दिग्दर्शक मधुर भांडारकर, प्रसिद्ध गायक शान, महापालिका आयुक्त अजोय महेता, मुंबई पोलिस सहआयुक्त देवेन भारती, संगीतकार जतीन ललीत आदी सेलिब्रेटींसह सुमारे एक हजार पोलीस जवान, विशेष मुले आणि सामान्य नागरीकही सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, योग ही भारतीय चिकित्सापद्धत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगा दिनाची संकल्पना मांडल्या नंतर सर्वच देशांनी त्याला प्रतिसाद दिला. आज १७० हून जास्त देश योगा दिन साजरा करत असून योग ही निरामय आयुष्यासाठी अत्यंत उपयुक्त चिकित्सापद्धत आहे. तिचा वापर करून हे जग निरामय करूया, असेही ते म्हणाले. तर मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार म्हणाले की, प्रथमच मुख्यमंत्री मुंबई पोलीस दलाच्या जवानांसोबत हा अशाप्रकारे योगा करून योगदिन साजरा करत आहेत. या कार्यक्रमाला नागरिकांनीही उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह पोलिस आणि नागरिकांचेही आभार मानतो.या कार्यक्रमाला उपमहापौर अलका केरकर, मुंबई मॅरेथॉन चे आयोजक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment