मुंबई, दि. 16 : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने राबविण्यात येणारी ‘बृहन्महाराष्ट्र मंडळांना अर्थसहाय्य’ ही योजना आता राज्य मराठी विकास संस्थेकडे वर्ग करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण, 2010 अंतर्गत ‘बृहन्महाराष्ट्र मंडळांना अर्थसहाय्य’ ही योजना समाविष्ट करण्यात आली होती. महाराष्ट्राबाहेर मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी कार्य करणाऱ्या देशांतर्गत बृहन्महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त संस्थांना/ मंडळांना 20 लाख रुपये (प्रत्येकी 2 लाख रुपयांच्या मर्यादेत) अर्थसहाय्य दिले जाते. 17 एप्रिल 2015 च्या शासन निर्णयाद्वारे या योजनेला मिळाली होती. या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत होती. परंतु या योजनेचा विषय हा राज्य मराठी विकास संस्थेच्या घटनेतील ‘अन्य राज्यात व परदेशात असलेल्या मराठी भाषकांसाठी विविध भाषिक उपक्रम करणे’ या उद्दिष्टाचाच भाग असल्यामुळे ही येाजना महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून राज्य मराठी विकास संस्थेकडे वर्ग करण्यात आली आहे.
या योजनेसंदर्भात राज्य मराठी विकास संस्था आता 17 एप्रिल2015 रोजी घेण्यात आलेल्या शासन निर्णयाद्वारे निश्चित करण्यात आलेले निकष व मार्गदर्शक सूचनांच्या आधारे या योजनेची अंमलबजावणी करेल. याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्याwww.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक 201606131457150933 असा आहे.
No comments:
Post a Comment