मुंबई दि. 3 : विविध भाषांतील ग्रंथांचे मराठीत भाषांतर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे भाषांतरकारांना देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच भाषांतरित पुस्तकांच्या हस्तलिखितावर अभिप्राय देणाऱ्या तज्ज्ञांच्या मानधनातही वाढ करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून उत्कृष्ट ग्रंथांचे भाषांतर ही योजना राबविण्यात येते. भारतीय भाषांमधील तसेच भारतीयेतर भाषांमधील विविध विषयावरील मौलिक व महत्वपूर्ण ग्रंथांची भाषांतरे मराठी भाषेत उपलब्ध करुन देणे, हा योजनेचा मुख्य हेतू आहे.
उत्कृष्ट ग्रंथांचे भाषांतर या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून प्रकाशित करण्यात येणाऱ्या भारतीयेतर (परदेशी) भाषांमधील पुस्तकांचे तसेच अन्य भारतीय भाषेतील पुस्तकांचे मराठी भाषेत भाषांतर करण्यासाठी मुळ ग्रंथातील 1000 शब्दांना एक हजार रुपये मोबदला देण्यात येणार आहे. भाषांतरित पुस्तकांच्या हस्तिलिखितांची तपासणी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तज्ञांना एका हस्तलिखिताकरिता तीन हजार रुपये इतके मानधन देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य आणि संस्कृती मंडळामार्फत भाषांतर योजनेसाठी कार्यनियमावली तयार करण्यात येणार असून या कार्यनियमावली प्रमाणे भाषांतर कार्य पूर्ण करणे भाषांतरकाराला बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र राज्य आणि संस्कृती मंडळाकडून भाषांतरकाराकडे भाषांतरासाठी सोपविण्यात आलेल्या अन्य भारतीय/ भारतीयेतर भाषेमधील ग्रंथांचे भाषांतर, मंडळाच्या सुचनेनुसार झाले नसल्यास संपूर्ण भाषांतर नाकारण्याचा अधिकार हा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळास राहणार आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळास अन्य भारतीय/भारतीयेतर भाषेतील उत्कृष्ट ग्रंथांच्या भाषांतरीत पुस्तकांच्या छपाईनंतर भाषांतरकारास भाषांतरित पुस्तकाच्या 5 ते 10 प्रती विनामूल्य वितरीत करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. याशिवाय सदर मंडळ प्रकाशित करीत असलेल्या भाषांतरित पुस्तकाच्या प्रकाशनाचे सर्व हक्क मंडळास प्रदान करण्यात आले आहेत. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्याwww.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेताक 201606021450337833 असा आहे.
No comments:
Post a Comment