मुंबई, दि. ३१ : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील बेरोजगार दिव्यांग व्यक्तिंच्या स्वयंरोजगार स्टॉलसंदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावेत, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील दिव्यांग व्यक्तिंच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात आज मंत्रालयात श्री. बडोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे, बृहन्महाराष्ट्र टेलिफोन बुथ संघटनेचे अध्यक्ष मंगेश मालोंडकर, अपंग शासनचे संपादक जयभीम शिरोडकर यांच्यासह विविध दिव्यांग संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
बडोले म्हणाले की, दिव्यांग व्यक्तिंच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील दिव्यांग व्यक्तिंच्या स्टॉलची २०१३ पासूनची प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यासंदर्भात आयुक्तांनी तातडीने योग्य ते निर्णय घ्यावेत. तसेच दिव्यांग व्यक्तिंच्या स्टॉलचे हस्तांतरण, स्टॉल वितरणासाठीची वयाची मर्यादा, महापालिकेच्या निधीतून दिव्यांग व्यक्तिंच्या स्टॉलचे वितरण आदीसंदर्भात महानगरपालिकेने तातडीने तपासणी करून निर्णय घ्यावेत. दिव्यांग व्यक्तिंच्या स्टॉलवर इतर वस्तूंच्या विक्रीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाही करावी. राज्यातील दिव्यांगा व्यक्तिंना मोटारसायकल घेण्यासाठी अनुदान देता येईल का,यासंदर्भातही विभागाने विचार करावा, असेही श्री. बडोले यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment