५१ हजार करोड रुपये बँकेत ठेवणाऱ्या महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक
|
मुंबई / प्रतिनिधी / 15 June 2016 - जगातील श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबई महानगरपालिकेची ओळख आहे. मुंबई महानगरपालिकेने नागरिकांकडून कर रूपाने जमा केलेले ५१ हजार करोड रुपये विविध बँकेमध्ये जमा आहेत असे असताना महानगरपालिकेची आर्थिक स्थिती खराब असल्याचा दावा करत पालिका रुग्णालयामधील उपचार महाग करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. पालिकेचा रुग्णालयांवरील होणारा खर्च अधिक असून त्या प्रमाणात जमा होणारा महसूल अत्यंत कमी आहे. त्यामुळे जमा आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने महापालिका प्रशासनाने महापालिकेच्या सर्व रुग्णालयांतून रुग्णांसाठी आकारण्यात येणार्या शुल्कात वाढ केली जाणार आहे. तसा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असून पालिका गट नेत्यांच्या बैठकीत प्रस्ताव सादर केला जाणार आहे.
यापुढे महापालिका रुग्णालयांतील प्रयोगशाळेत कोणतीही चाचणी मोफत होणार नाही. प्रत्येक चाचणीसाठी 20 रुपयांपासून 100 रुपये द्यावे लागतील. खासगी रुग्णालयांतून विविध चाचण्या करण्यासाठी आलेल्या रुग्णांच्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. उपचार शुल्कात 100 रुपयांपासून अडीच हजारांपर्यंत वाढ करण्याची शिफारस प्रशासनाने केली आहे. रुग्णांच्या शुल्कात 75 ते 100 टक्के वाढ होईल. या वाढलेल्या शुल्काबरोबरच मुंबईबाहेरील रुग्णांकडून जादा 20 टक्के शुल्क घेतले जाईल. या दरवाढीमुळे महापालिकेला 92.8 कोटीं रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणार असून गटनेत्यांच्या बैठकीत या दरवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. महापालिका सभेत ज्या दिवशी या प्रस्तावास मंजुरी मिळेल त्यानंतर येणार्या १ तारखेपासून ही दरवाढ लागू होणार आहे.
महापालिका रुग्णालयात खर्चापैकी पाच टक्के रक्कमही रुग्ण शुल्कातून वसूल होत नाही. 15 वर्षांत या शुल्कात वाढ झालेली नाही. खर्च वाढत असताना उत्पन्न वाढत नसल्याने महापालिकेने शुल्कवाढ करणे आवश्यक आहे, असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. महापालिकेच्या केईएम, नायर व शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात 2014-15 या वर्षात 639 कोटींचा खर्च झाला होता. रुग्ण सेवेतून पालिकेला 31 कोटी 69 लाखांचे उत्पन्न मिळाले होते. या सरसकट 70 ते 100 टक्के वाढीबरोबरच मुंबईबाहेरून येणाऱ्या रुग्णांना 20 टक्के जादा शुल्क द्यावे लागणार आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. तसेच महापालिकेचे ५१ हजार करोड रुपये बँकांमधून पडून असताना गटनेते या शुल्क वाढीला मंजुरी देणार का याकडे मुंबईकर नागरिकांचे लक्ष लागले आहे.
शुल्कवाढ
वैद्यकीय सेवा - सध्याचे दर - प्रस्तावित दर
अतिविशेष शस्त्रक्रिया - 5 हजार - 7 हजार 500
विशेष शस्त्रक्रिया - 500 - 800
किरकोळ शस्त्रक्रिया - 200 - 300
प्रसूती (दुसऱ्या मुलानंतर) - 500 - 750
चाचण्यांचे शुल्क (रुपये)
प्रकार - सध्याचे दर - प्रस्तावित दर
एक्स रे (फिल्मसाठी) - 60 - 90 रुपये
बी.एम.आर. चाचणी - 60 - 100 रुपये
एमआरआय - 2500 - 3000
अल्ट्रा सोनोग्राफी - 100 - 150
थायरॉईड - 100 - 150
कलर डॉपलर - 500 - 750
ईसीजी - 20 - 50
प्रयोगशाळा चाचण्यांसाठी पहिल्यांदाच शुल्क
प्रकार - दर
एबीजी - 100 रुपये
पीटी - 100 रुपये
युरिन - 20
ग्लुकोज पीपी - 10
स्मॉल बायोप्सी - 50
स्टूल - 20
No comments:
Post a Comment