फेरीवाल्यांकडील २६ टक्के पाणी नमुन्यांमध्ये देखील आढळून आले `इ-कोलाय' जीवाणू
जलजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी काळजी घेण्याचे महापालिकेचे आवाहन !
मुंबई / प्रतिनिधी
महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने महापालिका क्षेत्रातील सर्व २४ विभागांमधील बर्फ विक्रते, हॉटेल्स व बार, फ्रूट ज्यूस सेंटर, उसाच्या रसाचे स्टॉल्स, डेअरी, मिठाईची दुकाने, बर्फाचे गोळेवाले, लस्सी व ताक विक्रेते, फास्ट फूड सेंटर्स इत्यादी खाद्य व पेय पदार्थ विक्रेत्यांकडील बर्फाच्या नमुन्यांची चाचणी केली असता एकूण ९४८ बर्फ नमुन्यांपैकी सुमारे ९२ टक्के म्हणजेच ८७० बर्फ नमुन्यांमध्ये `ई-कोलाय' हे जीवाणू आढळून आले आहेत. तर फेरीवाल्या खाद्यपदार्थ व पेयपदार्थ विक्रेत्यांकडील ४७६ पाणी नमुन्यांपैकी १२६ पाणी नमुन्यांमध्ये म्हणजेच २६ टक्के पाणी नमुन्यांमध्ये `ई-कोलाय' हे जीवाणू आढळून आले आहेत. सामान्यपणे मानवी विष्ठेमध्ये `ई-कोलाय' हे जीवाणू आढळून येतात. या जीवाणूंच्या प्रादुर्भावामुळे गॅस्ट्रो (अतिसार), जुलाब, यासारखे जलजन्य आजार होऊ शकतात. ही बाब लक्षात घेता, खाद्यपदार्थ व पेय पदार्थ विक्रेत्यांकडील पाणी पिणे, बर्फ मिश्रीत पेय पिणे, तसेच खाद्यपदार्थ खाणे याबाबत नागरिकांनी अतिशय काळजी घ्यावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे करण्यात आले आहे.
पावसाळयात पसरणाऱया जलजन्य आजारांना प्रतिबंध व्हावा यासाठी खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडील पाणी नमुन्यांची चाचणी करण्याची मोहिम अधिक व्यापक करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले होते. त्यानुसार १ मे ते ३१ मे २०१६ या कालावधीत महापालिका क्षेत्रातील खाद्यपदार्थ व पेयपदार्थ विक्रेत्यांकडील बर्फ व पाणी नमुन्यांची चाचणी करण्यात आली. या चाचणी दरम्यान महापालिकेच्या बी, सी, डी, एफ उत्तर, जी उत्तर, के पूर्व, आर दक्षिण, एन आणि टी या विभातील सर्व म्हणजेच १०० टक्के बर्फ नमून्यांमध्ये `ई-कोलाय' बाधित नमुने आढळून आले आहेत. तर महापालिका क्षेत्रातील एकूण नमुन्यांपैकी ९२ टक्के बर्फ नमुन्यांमध्ये `ई-कोलाय' बाधित नमुने आढळून आले आहेत.
खाद्य व पेय पदार्थ विक्रेत्यांकडील बर्फ व पाणी नमून्यांमध्ये `ई-कोलाय' बाधित नमुने मोठ्या प्रमाणात आढळून आल्याची बाब महापालिकेने गंभीरपणे घेतली असून ज्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडील पाणी नमुन्यांमध्ये `ई-कोलाय' जीवाणू आढळून आले आहेत त्या सर्व विक्रेत्यांबाबत महापालिकेच्या विभाग स्तरावरुन नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे. अधिक तीव्र करण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान ५५२ दुकाने, २,९९५ फेरीवाले खाद्यपदार्थ विक्रते यांच्याकडील बर्फ व पाणी नमुने इत्यादी बाबींची चाचणी करण्यात आली. या चाचणीत बाधित आढळून आलेले नमुने तात्काळ नष्ट करण्यात आले. या अंतर्गत सुमारे १ हजार १२९ किलो मिठाई, ४ हजार ५६५ किलो खाद्यपदार्थ, ४ हजार ८१८ लीटर्स पेय पदार्थ यासह सुमारे ३ हजार ९०० किलो फळे व भाज्या नष्ट करण्यात आल्या.
No comments:
Post a Comment