आंबेडकर भवनच्या निमित्ताने - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 June 2016

आंबेडकर भवनच्या निमित्ताने

बाबासाहेबानी शिका संघटित व्हा संघर्ष करा असा मूलमंत्र दिला. बाबासाहेबानी शिकून एकत्र येऊन अन्याया विरोधात संघर्ष करण्यास सांगितले. परंतू आंबेडकरी जनता शिकली, कळपा कळपाने एकत्र झाली आणि आपआपसात संघर्ष करू लागली आहे. इंग्रज भारतात राज्य करण्यासाठी आले तेव्हा त्यांनी येथील लोकांना आपआपसात भांडवून भारतावर दीडशे वर्षे राज्य केले. आजही आंबेडकरी जनतेला इंग्रजांच्या नीती प्रमाणे आपआपसात भांडवत ठेवले गेले आहे. याचा परिणाम म्हणून आंबेडकरी समाज अद्याप आपल्या हातात सत्ता घेऊ शकलेला नाही. अशीच परिस्थिती इतर संस्थांची झाली आहे.

बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यू नंतर त्यांनी स्थापन केलेल्या पिपल्स एज्युकेशन ट्रस्ट, पिपल्स इम्प्रुव्हमेन्ट ट्रस्टच्या हजारो करोडो रुपयांच्या संपत्तीवरून वाद सुरू झाले. हे वाद आजही बाबासाहेबांच्या मृत्यू नंतर ६० वर्षे आजही सुरू आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान लिहिले. या संविधानावर आपला भारत देश चालत आहे. बाबासाहेबांच्या संविधानाची जगात वाहव्वा केली जात आहे. भारतीय संविधानाला जसा आदर्श मानला जातो तसाच आदर्श बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संस्थाकडून लोकांना मिळणे अपेक्षित आहे. परंतू बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संस्थाच्या वर्चस्वाच्या वादात लोकांना वेगळाच संदेश जात आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीयतेचे अस्पृश्यतेचे चटके सहन करत आपले शिक्षण पूर्ण केले. आपल्या समाजातील लोक कोणत्या परिस्थितीमध्ये जगात आहेत याची जाणीव असलेल्या बाबासाहेबानी पशु पेक्षाही हिन वागणूक मिळणाऱ्या माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला. बाबासाहेब एवढ्यावरच थांबले नाहीत. बाबासाहेबानी गरीब आन उपेक्षित समाजातील मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून शैक्षणिक संस्था स्थापन केल्या. या शिक्षण संस्थांची अनेक कॉलेज सध्या सुरू आहेत. शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत म्हणून सिद्धार्थ वस्तीगृह बांधले. परंतू या सिद्धार्थ वस्तीगृहाचे दुर्दैव असे की एकदाही डागडुजी न केल्याने दोन वर्षा पूर्वी वसतिगृह धोकादायक ठरवून पाडण्यात आले. 

बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थेची अवस्था बिकट आहे. आपआपसातील वादामुळे आणि शैक्षणिक संस्थेच्या विश्वस्त मंडळावर आपलाच दावा सांगण्याच्या प्रकारावरून न्यायालयात वाद सुरू आहेत. असे वाद सुरूच राहिल्यास येणाऱ्या दिवसात राज्य सरकार बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्थांवर प्रशासक नेमू शकते याची जाणीव ठेवण्याची गरज आहे. शिक्षण संस्थेप्रमाणेच पिपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टमध्येही वाद सुरू आहेत. या वादामध्येच दादर येथील आंबेडकर भवन रात्रीच्या अंधारात पाडून टाकण्यात आले आहे. यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये सध्या तीव्र असंतोष पसरला आहे.

सिद्धार्थ वसतिगृह ज़से प्रत्येक आंबेडकरी समाजातील गरीब विद्यार्थ्याला आपले हक्काचे घर वाटत होते असेच हक्काचे आणि कधीही येऊन भेटण्याचे, मिटिंग, सभा, कार्यक्रम घेण्याचे ठिकाण आंबेडकर भवन होते. आंबेडकर भवना बरोबर आंबेडकरी समाजातील लोकांची नाळ जोडली होती. शनिवारी (२५ जून २०१६) अचानक रात्री ३ वाजता आंबेडकर भवन तोंडल्याची बातमी आंबेडकरी जनतेपर्यंत पोहचली आणि आंबेडकरी जनता आंबेडकर भवन आणि तेथून भोईवाडा पोलीस ठाण्याकडे जमू लागली. भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन सेना, भारतीय बौद्ध महासभा या पक्ष आणि संघटनांची कार्यालये व बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली प्रिंटिंग प्रेस या आंबेडकर भवन मध्ये असल्याने वातावरण चांगलेच तापले होते. 

आंबेडकर भवन पाडताना या इमारती मध्ये असलेली पक्ष, संघटनेची कार्यालये खाली करण्यात आलेली नाही. विश्वस्तांना इमारत पडायची इतकी घाई झाली होती की त्यांना बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रिंटिंग प्रेस उभारून त्यामध्ये छपाई केलेले मुकनायक ,बहिष्कृत भारत  ही वृत्तपत्रे सुरू करून वंचिताना न्याय मिळवून दिला. त्या प्रिंटिंग प्रेसवरही बुलडोझर चालवण्यात आला. रात्री तीन वाजल्यापासून अंधारात लपून छपून आंबेडकर भवन पाडण्यात आले. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात भादंवि कलम १४२,१४३,१४४,१४६,१४७,१४८,१४९,४५२,३८०,३९५,४२७,३४ नुसार (एफआयआर नंबर - २०८/१६) श्रीकांत गवारे, योगेश व्हरांडे, नागसेन सोनारे, अभय बांबोले, बोधवडे, रत्नाकर गायकवाड यांच्यासह ४०० ते ५०० अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

शनिवारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यावर भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी पोलिसांना दोषी लोकांवर कारवाई करावी अन्यथा सोमवार पासून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. परंतू आंबेडकर भवन धोकादायक झाले होते. मुंबई महानगरपालिकेने १ जून २०१६ रोजी ही इमारत धोकादायक असल्याने खाली करण्याची नोटीस दिली होती. या नोटिसी प्रमाणे आंबेडकर भवन खाली करणे गरजेचे होते. अन्यथा अपघात झाला असता तर ट्रस्टला जबाबदार धरण्यात आले असते. पालिकेच्या नोटिसी नुसार आंबेडकर भवन पाडण्यात आल्याचा दावा विश्वस्त मंडळाने केला आहे. 

आंबेडकर भवन पाडल्यावर त्याच ठिकाणी १७ माजली आंबेडकर भवन बांधले जाणार आहे. आंबेडकर भवनावाच्या कोनशिला उद्घाटनाचा कार्यक्रम डॉ. आंबेडकर यांच्या जयंती दिनी भारत व स्काऊट गाईड सभागृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे. मुख्यमंत्र्यानी या कार्यक्रमात आंबेडकर भवन उभारण्यास ७ कोटी रुपयांचा निधी जाहिर केला आहे. १७ मजली सुसज्ज अश्या आंबेडकर भवनात वाचनालय, ध्यान विपश्यना केंद्र, अद्ययावत सामाजिक सांस्कृतिक सभागृह, रंगमंच, कम्युनिटी हॉल, प्रशिक्षण आणि कार्यशाळा केंद्र, कायदा सहाय्य केंद्र, अभ्यास संशोधन केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.  

पिपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टला नवी मुंबईमध्ये दिलेला भूखंड शैक्षणिक, सामाजिक कामासाठी ना वापरता इतर कामासाठी वापरल्याने ट्रस्टला पालिकेने नोटीस दिल्याचे वृत्त आहे. नवी मुंबईमध्ये ज्या कामासाठी जागा दिली ती इतर कामासाठी वापरल्याने ट्रस्टच्या विश्वस्ताबाबत आंबेडकरी जनतेला विश्वास राहिलेला नाही. याच विश्वस्त मंडळाने प्रकाश आंबेडकर यांना ट्रस्टचे अध्यक्षपद हवे आहे. आनंदराज व भीमराव यांनी आंबेडकर भवन मधील एक एक मजला मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. जर अशी मागणी झाली असेल तर याआधी आंबेडकरी जनतेला याची माहिती ट्रस्टच्या वतीने दिली असती तर शनिवारी आंबेडकरी जनता संतप्त झाली नसती. 

बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या ट्रस्टवर विश्वस्त मंडळ असले तरी या विश्वस्त मंडळाने पारदर्शक काम करत आंबेडकरी जनतेला सत्य परिस्थिती आणि आपण राबवत असलेल्या उपक्रमाची माहिती वेळोवेळी देत राहणे गरजेचे आहे. पिपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट जनतेच्या भल्यासाठी असल्याने लोकांना सोबत घेऊन पुढे जायला हवे. आंबेडकर भवन या ठिकाणी पुन्हा कधी पर्यंत उभे राहील याची शाश्वती विश्वस्त मंडळाने आंबेडकरी जनतेला द्यायला हवी. प्रकाश, आनंदराज आणि भीमराव हे बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असल्याने आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे रक्त त्यांच्यात असल्याने आंबेडकरी जनतेची सहानभूती त्यांना आहे. यामुळे विश्वस्त मंडळाने आंबेडकर भवन मध्ये भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन सेना, भारतीय बौद्ध महासभा, आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली प्रिंटिंग प्रेस याला जागा द्यावीच  लागेल. 

जाता जाता एक सांगावेसे वाटते बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संस्थावरून वाद सुरू आहेत. बाबासाहेबांमुळे आपल्याला अधिकार मिळाले, शिक्षण घेता आले, शिक्षण घेऊन अनेक लोक मोठे झाले आहेत. अश्या सर्वानी बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांचे उपकार मानायला हवे. बाबासाहेबांच्या या उपकारामुळे अनेक लोक अनेक पदे भूषवित आहेत. अश्या पैकी एकालाही आपणही बाबासाहेबांसारखे काम करून आपल्या समाजाला मदत केली पाहिजे असे वाटत नाही. उलट बाबासाहेबानी ज्या संस्था, वास्तू उभ्या केल्या त्या संस्था आणि वास्तूमध्ये वाद करून त्याचा नामोनिशाण मिटविण्याचे प्रकार सुरू आहेत. असे प्रकार थांबणे गरजेचे आहे. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या शिक्षण आणि सामाजिक संस्था तसेच वास्तूवरून वाद घालत बसण्यापेक्षा स्वतःच्या हिमतीवर अश्या संस्था उभ्या करून आंबेडकरी जनतेचे भले करण्याची गरज आहे. 

अजेयकुमार जाधव 
मो. ९९६९१९१३६३ 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad