मुंबई : १00 मिडी बसेस भाड्याने घेण्यासाठी बेस्ट प्रशासनाने खासगी कंत्राटदारांकडून ई-टेंडरिंगव्दारे निविदा मागविल्या आहेत. हा एकप्रकारे बेस्टच्या खासगीकरणाचा डाव असून त्याला विरोध करण्यासाठी बुधवारी दुपारी बेस्ट वर्कर्स युनियनने वडाळा डेपो येथे निदर्शने केली. शिवाय या बसेस रस्त्यावर आणल्या, तर बंद करण्यात येईल, असा इशाराही संघटनेने बुधवारी दिला आहे.
यासंदर्भात संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, बेस्ट प्रशासनाने १00 मिडी बसेस खासगी कंत्राटदारांकडून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात प्रति किलोमीटरप्रमाणे या बसना दर ठरवून देण्यात येणार आहेत. प्रतिदिन किमान २00 किलोमीटर्स बस चालनाची हमीही कंत्राटदारांना देण्यात आली आहे. कंत्राटदाराला प्रती किलोमीटर देण्यात येणाऱ्या दरामध्ये प्रतिवर्षी पाच टक्क्यांची वाढ देण्यात येईल आणि त्याशिवाय प्रतिवर्षी इंधनाच्या दरातील फरकाची वाढसुद्धा देण्यात येणार असल्याचे संघटनेने सांगितले.
प्रवासी कराची जबाबदारी कंत्राटदारावर टाकण्याऐवजी बेस्ट उपक्रमाने स्वत:वर घेतल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. खासगी कंत्राटदारांना त्यांच्या यंत्रणेसाठी प्रती बस वर्ष एक रुपये या दराने शिवाजीनगर, देवनार, मालवणी या आगारांच्या बाजूला असलेले मोक्याचे भूखंड देण्यात येणार आहे. त्या भूखंडावर या खासगी कंत्राटदारांच्या बसगाड्यांची देखभाल करण्यासाठी लागणारी यंत्रणा, मुलभूत सोयीसुविधा उभी करण्यास परवानगीही कंत्राटात देण्यात आल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment