मुंबई / प्रतिनिधी - केवळ ७५ उद्याने ताब्यात असताना तब्बल २३७ उद्यानांच्या विकासासाठी कंत्राटदार नेमून कामे देण्यात आली आहेत. हे कंत्राट देऊन दोन महिने उलटले तरी प्रशासनाला केवळ २५ उद्यानेच ताब्यात घेता आली आहेत. त्यामुळे उर्वरित मैदाने कधी ताब्यात घेणार व त्यांचा विकास कसा करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुंबईतील दत्तक तत्त्वावर दिलेली मैदाने, उद्याने व मनोरंजन मैदानांचे मोकळे भूखंड संस्थांच्या ताब्यातून घेण्याची प्रक्रिया महापालिकेतर्फे पूर्ण झाली नसताना या सर्व मोकळय़ा जागांच्या विकासासाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. दत्तक म्हणून दिलेल्या विविध संस्थांच्या ताब्यातील २३६ उद्याने, मैदाने व मोकळे भूखंड, तसेच रस्ता दुभाजक २ आणि इतर जागा ५ अशा सर्व जागांचा विकास करण्यासाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे.
एकूण २३ प्रभागांत राबवलेल्या या निविदांमध्ये तब्बल २१३ कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे. याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे आला असता विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांच्यासह विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी विरोध केला होता. जी उद्याने ताब्यातच नाहीत त्यांचा विकास करण्यासाठी आधीच का कंत्राटदार नेमले जातात, असा सवाल करत जी ७५ मैदाने व उद्याने ताब्यात घेण्यात आली त्यांच्यासाठी कंत्राटदार नेमण्यात यावा, अशी सूचना केली होती.
पण त्यानंतरही हा प्रस्ताव सत्ताधारी शिवसेना-भाजपाने मंजूर केला. मात्र कंत्राट देऊन दोन महिने उलटत आले तरी २५ मैदानेच ताब्यात घेण्यात महापालिकेला यश आले आहे. उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी आत्तापर्यंत तब्बल १०० उद्याने ताब्यात घेण्यात आल्याचे म्हटले आहे.
No comments:
Post a Comment