काँग्रेसने येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकलेमुंबई / प्रतिनिधी = मुंबईतील २१३ वार्डामध्ये मुंबई काँग्रेसतर्फे ब्लॉक अध्यक्ष व नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यांना मार्गदर्शन करताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले की, सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी जनतेसाठी २४ तास उपलब्ध रहा. लोकांमध्ये मिळून मिसळून रहा. जनतेच्या समस्या सोडवा व त्यांच्या अडी अडचणीना धावून जावा. जनतेची कामे करताना त्याचा धर्म व जात बघू नका. त्यांच्या उपयोगी पडा. आज पासून आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कामाला लागा.
पुढच्या महिन्यात सर्व ब्लॉक अध्यक्ष, पदाधिकारी, नगरसेवक, आमदार आणि खासदार यांच्यासाठी एक दिवसीय मार्गदर्शन शिबीर आयोजित करणार आहोत. या एक दिवसीय शिबिराला कदाचित काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी येण्याची शक्यता आहे, अशी माहिती संजय निरुपम यांनी दिली. ते पुढे म्हणाले की काही लोक म्हणतात की काँग्रेस संपली पण मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांची सात पिढ्या आल्या तरी काँग्रेस कधी संपू शकत नाही. तुम्ही सगळे कामाला लागा, महानगरपालिकेतील निवडणुकीत काँग्रेसच जिंकणार आहे, असा मला विश्वास आहे. यावेळी त्यांनी शिवसेना व भाजपा वर सडकून टीका केली. शिवसेना व भाजपच्या भ्रष्टाचाराला मुंबईतील जनता कंटाळलेली आहे. मुंबईकर निराश झाले आहेत. मुंबईकरांना कोणत्याच सोयी सुविधा मिळत नाही आहेत. शुद्ध व मुबलक पाणी, चांगले रस्ते, स्वच्छता, नाले सफाई अशी महत्वाची कामे करण्यात शिवसेना भाजपा सरकार पूर्णतः अपयशी ठरलेली आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की आगामी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळणार आहे.
No comments:
Post a Comment