मुंबई, दि. 13 : राज्यात सततची दुष्काळी परिस्थिती, हवामान बदल, गरीबी, आर्थिक बाबीतील कमतरता याचा परिणाम महिलांच्या विकासावर होत असतो. परंतु त्यांना उचित संधी मिळाल्यास महिला प्रत्येक क्षेत्रात आपले स्थान निर्माण करून देशाच्या विकासात भर घालतात. समाजाचा शाश्वत विकास साधण्यासाठी महिलांचा सामाजिक, आर्थिक, आरोग्याचा विकास होणे आवश्यक आहे, असे राज्यपाल चे. विद्यासागर राव आज येथे म्हणाले.
इंडियन मर्चंट चेंबरच्या महिला शाखेचा वार्षिक पारितोषिक समारंभाचे रूफ टॉप, ट्रायटंड हॉटेल येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ॲक्सिस बॅंकेच्या उपाध्यक्ष अमृता फडणवीस आणि इंडियन मर्चंट चेंबरच्या अध्यक्ष शालीनी पिरामल तसेच सदस्य उपस्थित होते.
आज प्रत्येक क्षेत्रात महिला कार्यरत आहेत. मेक इन महाराष्ट्र, स्कील इंडिया, स्टॅण्ड अप इंडिया च्या माध्यमातून सामान्य महिलाही सक्षम होण्यासाठी या विविध योजनांचा उपयोग करून घेता येईल, असेही विद्यासागर राव म्हणाले.
फडणवीस म्हणाल्या की, महिला या उद्योग, सामाजिक आणि इतर क्षेत्रात अतुलनीय कार्य करीत आहेत. शासन महिलांच्या संरक्षणासाठी विविध योजना राबवित असते. त्याचबरोबर मेक इन इंडिया,स्टॅण्ड अप इंडिया मध्ये अनुसुचित जाती, जमाती,इतर मागासावर्गीय महिलांना समावून घेण्यात येत आहे. हे सर्व उपलब्ध होत असताना महिलांनी मोठ्या प्रमाणात सक्षम होण्यासाठी पुढे आले पाहिजे.
यावेळी राज्यपाल चे.विद्यासागर राव, अमृता फडणवीस यांच्या हस्ते पद्मभूषण, आदित्य ग्रुप सेंटरच्या अध्यक्ष राजश्री बिर्ला, स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य, पिरामल फाउंडेशनच्या डॉ.स्वाती पिरामल, रेस्क्यू फाउंडेशनच्या अध्यक्ष त्रिवेणी आचार्य यांना आपल्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल गौरविण्यात आले.
No comments:
Post a Comment