मुंबई / प्रतिनिधी - वर्धा जिल्ह्यात पूलगाव येथील दारुगोळा भंडारास काल लागलेल्या आगीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसास 5 लाख तर जखमींना 1 लाख रुपयांची मदत राज्य शासनाकडून देण्यात येईल असे वित्त व नियोजन मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
मुनगंटीवार यांच्यासह सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, जलसंपदा मंत्री गिरिश महाजन, वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पूलगाव येथे घटनास्थळाला भेट दिली त्याचबरोबर सावंगी मेघे येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली त्यावेळी ते बोलत होते. दारूगोळा भंडाराला लागलेल्या आगीमुळे जी मनुष्य आणि वित्त हानी झाली त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या सर्वांना दिलासा देऊन मनुगंटीवार म्हणाले की, राज्य शासनाला या घटनेची माहिती मिळताच खबरदारीच्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
अग्निशमन यंत्रणेबरोबर वैद्यकीय सुविधा आणि परिसरातील नागरिकांच्या निवासाची व्यवस्था ही करण्यात आली. घटनेच्या ठिकाणी एअर ॲम्ब्यूलन्स तैनात करण्यात आली असून जखमींना गरज पडल्यास मुंबई येथे हलवण्याचीही तयारी ठेवण्यात आली आहे अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी यावेळी दिली. या स्फोटामुळे गावातील घरांचे तसेच इतर मालमत्तेचे जे नुकसान झाले त्याचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.
No comments:
Post a Comment