मुंबई, दि. 31 : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानाचे दि. 3 जून रोजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे उद्घाटन होणार आहे. नवी दिल्लीच्या विज्ञानभवनमधून केंद्रीय मंत्री इराणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या अभियानात निवड झालेल्या 10 राज्यांशी सकाळी 11.00 वाजता संवाद साधणार आहेत.
केंद्र शासनाने राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान देशभरात सुरु केली आहे. राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता सुधारणे हा या अभियानाचा उद्देश आहे. या अभियानाची अंमलबजावणी महाराष्ट्रातही करण्यात येणार असून या योजनेअंतर्गत 18विविध उद्दिष्टे आहेत. राज्य शासनाने सादर केलेल्या आराखड्यामधून भौतिक सुविधा, शिक्षक प्रशिक्षण, संशोधन आणि नावीन्यपूर्ण उपक्रम या घटकाअंतर्गत निधी केंद्र शासनाकडून मंजूर झाला आहे. भौतिक सुविधा अंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून प्रयोगशाळांचे बळकटीकरण, संगणक प्रयोगशाळा निर्मिती, विद्यार्थी व वसतिगृह नूतनीकरण, ग्रंथालय, पुस्तके व ई-सुविधा, इ-कंटेन्ट लर्निंग मोड्युल आणि डिजिटल क्लासरुम इत्यादी कामे करण्यात येत आहेत.
महाराष्ट्राच्या डिजिटल क्लासरुम आणि इ-कंटेन्ट लर्निंग मोड्युलचा समावेश
या उद्घाटन कार्यक्रमातच महाराष्ट्र राज्याच्या वतीने सादर करण्यात आलेल्या प्रकल्पामधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या डिजिटल क्लासरुम आणि इ-कंटेन्ट लर्निंग मोड्युल याचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे महाराष्ट्राच्या वतीने ई-उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे विद्यापीठातून करण्यात येणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर, खासदार अनिल शिरोळे आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
No comments:
Post a Comment