मुंबई, दि. 20 : राष्ट्रीय महिला आयोग यांच्या सूचनेनुसार राज्य महिला आयोगाच्या वतीने उद्या मंगळवार दिनांक 21 जून 2016 रोजी ‘National Policy for Women 2016’ (राष्ट्रीय महिला धोरण 2016) या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज येथे दिली.
मंत्रालय पत्रकार कक्षात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, टाटा सामाजिक विज्ञान संस्था, ग्रंथालय सेमिनार हॉल, सातवा मजला, देवनार,मुंबई येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे चर्चासत्र होईल. महिलांचा सर्वांगीण विकास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत समाज पुढे जाऊ शकत नाही. हेच धोरण ठेवून केंद्र शासनाने महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी 15 वर्षानंतर राष्ट्रीय महिला धोरणाचा मसुदा तयार केला आहे. यात स्त्रियांच्या सर्व प्रश्नांचा विचार करण्यात आला आहे. हा मसुदा अंतिम करण्यापूर्वी त्याबाबत जनतेकडून सूचना, हरकती मागविण्यात आल्या आहेत. हा मसुदा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून तो अधिकाधिक परिणामकारक बनविण्याच्या उद्देशाने महिला क्षेत्रात कार्य करणारे कार्यकर्ते,स्वयंसेवी संस्था, अधिकारी आदींच्याही सूचना विचारात घेतल्या जाणार आहेत. त्याअनुषंगानेच उद्याच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यात राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांबरोबरच गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, मध्य प्रदेश, दादरा व नगरहवेली, दमण व दीव येथील राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, सदस्य सचिव व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
रहाटकर म्हणाल्या की, या चर्चासत्रात विविध विषयांवर पाच सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात महिलांचे शिक्षण, निर्णय प्रक्रियेतील त्यांचा सहभाग, महिलांवरील अत्याचार, महिलांचे आरोग्य, अन्न सुरक्षा, आर्थिक सक्षमीकरण अशा विविध मुद्द्यांवर विचारमंथन होणार आहे. त्या म्हणाल्या की, केंद्र शासनाच्या http://wcd.nic.in या संकेतस्थळावर या धोरणाचा मसुदा उपलब्ध आहे. लोकांनी हा मसुदा पाहून त्याबाबत आपल्या सूचना, हरकती महाराष्ट्र राज्य महिला आयोग, गृहनिर्माण भवन (म्हाडा बिल्डिंग), कलानगर,पोटमाळा, वांद्रे (पूर्व), मुंबई ५१ या पत्त्यावर अथवाmscwmahilaayog@gmail.com या इमेल पत्त्यावर २४ जून २०१६ पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
No comments:
Post a Comment