19 लाख 62 हजार शेतकऱ्यांना 12 हजार कोटींचे पीक कर्ज वाटप - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 June 2016

19 लाख 62 हजार शेतकऱ्यांना 12 हजार कोटींचे पीक कर्ज वाटप

मुंबई, दि. 10 : यंदा पावसाची स्थिती चांगली राहणार असल्याचे अंदाज विविध वेधशाळांनी वर्तवले आहेत. पेरणीपूर्व आणि पेरणीपश्चात कामासाठी शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या असून 2016-17 च्या खरीप हंगामासाठी मे 2016 अखेर राज्यातील 19 लाख 62 हजार 655 शेतकऱ्यांना 12 हजार 64 कोटी 93 लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप पूर्ण झाले आहे.

            
राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती देवून प्रत्यक्ष झालेल्या कामकाजाचा आढावा घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पालकमंत्र्यांना दिल्या आहेत. त्याचबरोबर थकीत पीक कर्जाचे पुनर्गठन करणे, पुनर्गठीत झालेल्या कर्जदारास नव्याने पीक कर्ज उपलब्ध करुन देणे, पात्र खातेदारांना पीक कर्ज मिळणे व राज्‍यातील कोणताही शेतकरी पीक कर्ज मिळण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी विविध उपाययोजना आखण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहे.
            
या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय बँकर्स समितीने सन 2016-17 या वर्षासाठी 51 हजार 235 कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्यापैकी रब्बी पीक कर्ज वाटपासाठी 13 हजार 568 कोटी रुपयांचे लक्ष निश्चित केले आहे. तर खरीप पीक कर्ज वाटपासाठी 37 हजार 677 कोटी रुपयांचे लक्ष निश्चित केले आहे. या लक्षांकापैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना 13 हजार 114 कोटी, व्यापारी बँकांना 22 हजार 168 कोटी तर ग्रामीण बँकांना 2 हजार 395 कोटी रुपयांचे लक्ष निश्चित करुन देण्यात आले आहे. त्यानुसार मे 2016 अखेर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत 15 लाख 10 हजार 863 शेतकऱ्यांना 7 हजार 86 कोटी 52 लाख रुपये तर  इतर बँकांनी 4 लाख 51 हजार 792 शेतकऱ्यांना 4 हजार 978 कोटी 41 लाख रुपये असे एकूण 19 लाख 62 हजार 655 शेतकऱ्यांना 12 हजार 64 कोटी 93 लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे. खरीप हंगाम 2016-17 च्या एकूण कर्ज वाटपाच्या प्रमाणात हे प्रमाण 32 टक्के इतके आहे. मे 2014 मध्ये कर्ज वाटपाचे हे प्रमाण 29 टक्के तर मे 2015 मध्ये हे प्रमाण 26 टक्के इतके होते.
            
राज्यातील खातेदार शेतकऱ्यांची संख्या 1 कोटी 36 लाख 43 हजार इतकी आहे. यावर्षी 80 टक्के खातेदार शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा करण्याचे शासनाचे नियोजन असून तसे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत सर्व बँकांना दिले आहेत. शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा तातडीने उपलब्ध करणेसाठी तसेच पीक कर्जाच्या पुनर्गठणाबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हयात शेतकरी मेळावे आयोजित करण्यात येत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना केलेल्या पीक कर्ज वाटपाचा आढावाही जिल्हाधिकारी स्तरावर घेतला जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad