मुंबई / प्रतिनिधी 24 June 2016 - रेल्वेची आरक्षित तिकिटे अनधिकृतपणे हस्तांतरित केल्याची प्रकरणे पश्चिम रेल्वेर उघडकीस आली आहेत. गेल्या तीन महिन्यांत जवळपास 1312 प्रकरणे उघडकीस आल्याची माहिती पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाकडून देण्यात आली. यात सर्वाधिक प्रकरणे मे महिन्यात उघडकीस आणण्यात आली आहेत.
रेल्वेच्या मेल-एक्सप्रेसची तिकिटे मिळवताना प्रवाशांच्या चांगलेच नाकी नऊ येतात. आॅनलाइन तिकीट आरक्षित करताना तर अवघ्या काही सेकंदांत मोठ्या वेटिंग लिस्टचा सामना प्रवाशांना करावा लागतो. त्यामुळे कशाही परिस्थितीत तिकीट मिळवण्यासाठी प्रवाशांकडून दलालांमार्फत तिकीट मिळवले जाते. काही प्रवासी तर अनधिकृत दलालांचा आधार घेत तिकीट मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. यात तर दलालांकडून एखाद्या प्रवाशाचे आरक्षित तिकीट दुसऱ्या प्रवाशाला अनधिकृतपणे हस्तांतरित केले जाते. आरक्षित तिकीट असलेल्या एखाद्या प्रवाशाने प्रवासाला जाण्याचे रद्द केल्यास तेच तिकीट दलालांकडून दुसऱ्या प्रवाशाला देण्यात येते. काही प्रवासी तर स्वत:हून आपले आरक्षित तिकीट ओळखीच्या व्यक्तीलाच देतात. अशाप्रकारे आरक्षित तिकीट हस्तांतरित करण्याची प्रकरणे उघडकीस आणण्यात आली आहेत.
मार्च ते मे या तीन महिन्यांत 1312 प्रकरणे उघडकीस आली असून, सर्वाधिक प्रकरणे मे महिन्यातील असल्याची माहिती देण्यात आली. एकट्या मे महिन्यात जवळपास 894 प्रकरणे उघडकीस आली आहेत. मे महिन्यात रेल्वेकडून विशेष ट्रेनही सोडल्या जातात. तरीही तिकीट मिळवताना बरीच मारामार करावी लागते. त्यामुळे मे महिन्यात अशाप्रकारची प्रकरणे जास्त उघडकीस येत असल्याचे सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment