मुंबई, दि. 10 जून : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने 55 व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील व 13 व्या बालनाट्य स्पर्धेतील प्राथमिक फेरीतील पारितोषिक विजेते कलाकार, तंत्रज्ञ व संस्था यांचा नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ रंगकर्मींच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. हा पारितोषिक वितरण समारंभ दि. 13 जून 2016 रोजी सायं. 6.30 वा. रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे होणार आहे.
यावर्षी कोकण विभागातून हौशी मराठी नाट्यस्पर्धेत 125 संस्थांनी तर बालनाट्यस्पर्धेत 41 संस्थांनी नाटके सादर केली. हौशी कलावंतांना महाराष्ट्र शासनामार्फत मोफत रंगमंच उपलब्ध व्हावा व हौशी कलाकारांनी सादर केलेल्या कलाकृती सर्व रसिक जनतेस पाहता याव्यात, कलाकारांचा गुणात्मक विकास व्हावा, त्यांच्या सृजनशील दृष्टीने रंगभूमी समृध्द व्हावी या उद्देशाने शासनातर्फे राज्य नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
कोकण विभागात मुंबई, ठाणे, कल्याण, रत्नागिरी आणि गोवा या स्पर्धा केंद्रावरील प्राथमिक फेरीतील प्राप्त कलाकारांना नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ रंगकर्मींच्या हस्ते प्रमाणपत्र, रौप्यपदक व धनादेश देऊन गौरविण्यात येईल. त्याचप्रमाणे उत्कृष्ट नेपथ्य, प्रकाश योजना, दिग्दर्शन,रौप्यपदके आणि अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे यावेळी वितरित करण्यात येतील.
पारितोषिक वितरण समारंभात ‘नमन नटवरा’ हा उमलत्या मनाचा रंगाविष्कार दर्शविणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना व दिग्दर्शन गणेश रेवडेकर यांनी केले आहे. ऋषीकेश परांजपे यांनी यांनी लेखन केले असून नेपथ्य अजय पुजारे यांचे आहे. या कार्यक्रमाचे संगीत निखिल राणे यांचे तर प्रकाश योजना संजय तोडणकर यांनी केली असून या कार्यक्रमात पंधरा नवोदित कलाकारांचा सहभाग आहे. या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नाट्य रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق