मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एकूण १४५ माध्यमिक शाळांचा यंदाच्या शालांत माध्यमिक परीक्षेचा एकूण सरासरी निकाल ७७.५० टक्के इतका लागला आहे. सन २०१५ च्या तुलनेत यावर्षीच्या निकालात ५ टक्के वाढ झाली असून ५ माध्यमिक शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. महापालिकेच्या शाळांमधून सर्वप्रथम येण्याचा बहुमान ग्लोबमिल पॅसेज इंग्रजी माध्यमिक शाळेच्या सायली सणस या विद्यार्थीनीने पटकाविला असून तिला ९४.८० टक्के गुण प्राप्त झाले. व्दितीय क्रमांक कोळीवाडा मनपा उर्दु माध्यमिक शाळेच्या नाजमीन बानो इश्तियाख अहमद अन्सारी या विद्यार्थीनीने पटकाविला असून तिला ९३.६० टक्के गुण प्राप्त झाले तर तृतीय क्रमांक एरंगळ मनपा माध्यमिक शाळेच्या गौरी चंद्रकांत लाड या विद्यार्थीनीने पटकाविला असून तिला ९३.४० टक्के गुण प्राप्त झाले.
अनुदानित व विनाअनुदानित माध्यमिक शाळांमधून एकूण ३२ विद्यार्थ्यांनी ९० टक्के व त्याहून अधिक गुण प्राप्त केले आहे. ज्या पाच शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे त्या पुढीलप्रमाणे - १) नरेपार्क मनपा माध्यमिक शाळा, परेल,२) सरस्वती बाग मनपा माध्यमिक मराठी शाळा, जोगेश्वरी (पूर्व), ३) गोखले मनपा इंग्रजी माध्यमिक शाळा, दादर (प.), ४) चकाला मनपा उर्दू माध्यमिक शाळा, तरुण भारत सोसायटी, अंधेरी (पूर्व), ५) मरोळ मनपा उर्दू माध्यमिक शाळा या शाळांचा समावेश आहे. बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने इयत्ता ९ वीमध्ये ७० टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणाऱया विद्यार्थ्यांकरिता सुपर २०० हा उपक्रम यशस्वीरित्या राबविल्याने गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या दहावीच्या निकालात भरीव वाढ झाल्याची माहिती उप आयुक्त (शिक्षण) रणजित ढाकणे यांनी दिली.
No comments:
Post a Comment