31 झाडे कोसळली, 11 ठिकाणी शोर्टसर्किटच्या घटना
हिंदमाता, सायन, माटुंग्याला पाणी साचले
हिंदमाता, सायन, माटुंग्याला पाणी साचले
मुंबई / प्रतिनिधी - मुंबईमधे रविवारी 19 जून पासून पावसाची सुरुवात झाली आहे. पालिकेने मुंबईत पाणी साचणार नाही असा दावा केला असताना पहिल्याच दिवशी पडलेल्या पावसात हिंदमाता, सायन, माटुंगा या परिसरात पाणी साचले. या साचलेल्या पाण्याचा निचरा ब्रिटानिया पम्पिंग स्टेशनमधील एक पंप सुरु ठेवल्याने अर्ध्या तासात करण्यात पालिकेला यश आल्याचे उपायुक्त सुधीर नाईक यांनी सांगितले.
रविवारी 19 जून रोजी सकाळी 8. 30 ते 20 जून सकाळी 8. 30 या चोवीस तासात शहर विभागात 47.1 मिमी, पूर्व उपनगरात 11.9 मिमी तर पश्चिम उपनगरात 18. 3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. रविवारी सायंकाळी पडलेल्या पावसात काळबादेवी येथील मनोहर इमारतीचा सज्जा कोसळुन अनुराग मिठाईलाल साठे वय 25 याचा मृत्यु झाला आहे. 6 ठिकाणी शोर्टसर्किटच्या घटना घडल्या असल्या तरी यामधे कुणीही जखमी झालेले नाही.
सोमवारी 20 जून रोजी शहर विभागात दुपारी 2 पर्यंत 15.4 मिमी, पूर्व उपनगरात 1.58 मिमी, तर पश्चिम उपनगरात 0.89 पावसाची नोंद झाली. धारावी क्रोस रोड येथील हजराबाई चाळीमधील 2 नंबर खोलीचा छताचा कौलारू भाग कोसळला यात किरण राममलिक वय 42 वर्षे हा इसम किरकोळ जखमी झाला आहे. 4 ठिकाणी शोर्टसर्किटच्या तर 9 ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या यात कोणीही जखमी झाले नाही. पूर्व उपनगरात दुपारी 12 च्या दरम्यान 5 ते 6 झोपडयावर एक झाड कोसळले यात नीता तेवर (20), प्रदीप तेवर (18), अबिद सलिम खान (16), रोशन प्रजापती (19) हे चार जण जखमी झाले आहेत.
No comments:
Post a Comment