मुंबई, दि. 17 : संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या जगातील सशक्त शहरांच्या संघटनात (स्ट्राँग सिटीज नेटवर्क) 'मुंबई' शहराने आपले अस्तित्व प्रस्थापित करुन महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे पर्व गाठले आहे. अमेरिकेपाठोपाठ तुर्की येथे 11 व 12 मे 2016रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत राज्याचे गृह (शहरे) राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुर्की येथे होणाऱ्या ‘स्ट्राँग सिटीज नेटवर्क’ परिषदेसाठी मुंबई शहराचे प्रतिनिधी म्हणून डॉ. रणजीत पाटील यांची नियुक्ती केली होती. दहशतवाद आणि हिंसाचाराविरुध्द नागरी सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने जगभरातील 35 प्रमुख शहरांची निवड केली असून त्यात मुंबईसह कोपनहेगन, न्यूयॉर्क,स्टॉकहोम्स, बर्मिंगहॅम, डेन्मार्क, फिनलंड,नायजेरिया, लंडन आदी शहरांचा/देशांचा सहभाग होता.
अमेरिकेनंतर तुर्की येथे आयोजित केलेल्या “स्ट्राँग सिटीज नेटवर्क”च्या आंतरराष्ट्रीय सुकाणू समितीच्या बैठकीसाठी सदस्य म्हणून गृह (शहरे) राज्यमंत्री डॉ. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. या प्रकल्पांतर्गत डॉ. पाटील यांनी तुर्कीतील अंटालिया व्होकेशनल ॲण्ड टेक्निकल अंटोलियन हायस्कूल तसेच इतर विविध प्रकल्पांना भेट देऊन माहिती घेतली.
या परिषदेत दहशतवाद आणि हिंसक अतिरेकी कारवायांच्या समूळ उच्चाटनासाठी प्रमुख शहरांसोबत जागतिक पातळीवरील रणनीती आखण्यात आली. अतिरेकी कारवायांकडे वळणाऱ्या युवक युवतींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्याच्या गृह विभागामार्फत ठरविलेल्या धोरणात कौशल्य विकास, शिक्षण, खेळ, आरोग्य अशा 13 क्षेत्रांचा समावेश केला तसेच राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाने आतापर्यंत केलेल्या यशस्वी कारवायांबाबतची माहिती डॉ. पाटील यांनी यावेळी दिली.
डॉ. रणजित पाटील म्हणाले की, दहशतवाद एका रात्रीत मिटवता येण्यासारखा नाही,दहशतवाद कोणत्या शहराचा, देशाचा, पंथाचा, जातीचा, धर्माचा नाही. दहशतवादी संघटना काळाच्या ओघात संपुष्टात येतील, कारण त्यांच्याकडे मृत्यू आणि दु:ख याशिवाय देण्यासारखे काहीच नाही. आपला विजय नक्कीच होणार, कारण आपण चांगल्या विचाराने, उच्च ध्येयाने प्रेरित आहोत.दहशतवाद आणि हिंसक अतिरेकी कारवाया थोपविण्याकरिता महाराष्ट्र पोलिस विभागाचे फोर्स वन हे पथक सतत कार्यरत आहे. मुंबई पोलिस आणि दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) तसेच सामाजिक पातळीवर स्थापन केलेल्या मोहल्ला कमिट्या हे सर्व आपापल्या परीने देशात शांती प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करीत आहेत. स्ट्राँग सिटीज नेटवर्कच्या आंतरराष्ट्रीय सुकाणू समिती सदस्य या नात्याने, मुंबई सामुदायिकपणे स्थानिक पातळीवर दहशतवाद आणि हिंसक अतिरेकी कारवाया रोखण्यासाठी समर्थपणे कार्यरत राहील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री या नात्याने डॉ. पाटील हे स्वत: आंतरराष्ट्रीय उद्योजकांनी सामंजस्य करार करुन महाराष्ट्रात उद्योग प्रस्थापित करणे, याकरिता प्रयत्न करीत आहेत. तसेच महाराष्ट्रातील युवकांना नोकरी व स्वयंरोजगार मिळण्याकरिता तुर्की येथे 11 व 12 मे रोजी आयोजित केलेल्या परिषदेत राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी सांगितले की, जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये तरुण मनुष्यबळाची टक्केवारी जास्त आहे. भारतामध्ये नव्या व विविध गुंतवणुकीच्या संधी निर्माण करुन जागतिक पातळीवर आर्थिकदृष्ट्या समर्थ होण्याचे सामर्थ्य आहे. जगाने भारताच्या युवा मनुष्यबळाचा वापर केल्यास आर्थिक समृध्दी व स्थिर लोकशाही अधिक बळकट होईल. हे चित्र ज्ञानाची देवाणघेवाण व सार्वजनिक व खाजगी क्षेत्रात भागीदारीच्या संधी निर्माण करणारे ठरेल. कौशल्य विकास व उद्योजकता याचे मार्गदर्शन युवा पिढीला मिळाल्यास अनेक जटील समस्यांचे निराकारण होऊन दीर्घकालीन आर्थिक स्थिरता लाभेल, असे सांगून सुरक्षित आणि समृध्द जग निर्माण करण्याचा संकल्प यावेळी डॉ. पाटील यांनी व्यक्त केला. या परिषदेस आमदार हरिश पिंपळे यांचीही उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment