मुंबई / प्रतिनिधी 24 May 2016
पर्जन्य जल उदंचनाच्या अनुषंगाने पावसाळ्यात उद्भवणा-या शक्यतांना सामोरे जाण्याची तयारी असावी, या उद्देशाने महापालिका क्षेत्रातील सर्व पर्जन्य जल उंदचन केंद्रांच्या ठिकाणी कत्राटदारांच्या कर्मचा-यांसह महापालिकेचे कर्मचारी देखील गरजेनुसार पर्यायी स्वरुपात कार्यतत्पर ठेवावेत आणि सर्व पर्जन्य जल उदंचन केंद्रे पूर्ण क्षमतेने वापरले जातील यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घ्यावी, असे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत. ते आज (दि. २४.०५.२०१६) पर्जन्य जल उदंचन केंद्रांच्या पाहणी दौ-या प्रसंगी महापालिकेच्या संबंधित अधिका-यांशी संवाद साधताना बोलत होते. या पाहणी दौ-यादरम्यान मेहता यांनी पावसाळ्यामध्ये नेहमी पाणी भरण्याच्या संभाव्य ठिकाणांना देखील भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली व तयारी कामांचा आढावा घेतला.
महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आज हाजी अली, लव्ह ग्रोव्ह, क्लिव्हलँड बंदर येथील पर्जन्य जल उंदचन केंद्रांसह रे रोड स्टेशन जवळील प्रस्तावित ब्रीटानिया पर्जन्य जल उंदचन केंद्रासही भेट दिली. या सर्व ठिकाणी तेथील परिस्थितीची पाहणी केल्यानंतर व पूर्वतयारी विषयक बाबींचा आढावा घेतल्यानंतर मेहता यांनी सर्व पर्जन्य जल उंदचन केंद्रांमध्ये डिझेल चा पुरेसा साठा ठेवण्याबाबत संबंधितांना आदेशित केले आहे. त्याचबरोबर काही तांत्रिक समस्या उद्भवल्यास समस्येचे तात्काळ निराकरण व्हावे, या उद्देशाने सदर सर्व ठिकाणांसाठी कंत्राटदाराच्या कर्मचा-यांसह महापालिकेचे कर्मचारी देखील गरजेनुसार पर्यायी स्वरुपात कार्यतत्पर असावेत, असेही आयुक्तांनी आदेशित केले आहे.
आजच्या पाहणी दौ-यादरम्यान महापालिका आयुक्तांनी पावसाळ्याच्या दिवसात नेहमी पाणी भरण्याच्या ठिकाणांचा देखील दौरा केला. यामध्ये हिंदमाता, मुंबई सेंट्रल परिसरातील नायर रुग्णालय, शीव येथील लोकमान्य टिळक महापालिका रुग्णालय आदी परिसरांचा समावेश होता. या सर्व ठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी असणारे पंप हे पूर्ण क्षमतेने चालू असावेत व त्या पंपांची चाचणी नियमितपणे घ्यावी असेही आदेश महापालिका आयुक्तांनी संबंधितांना दिले आहेत.
No comments:
Post a Comment