महापालिकेच्या स्थायी समितीत सोमय्यांच्या आरोपांचे पडसाद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 May 2016

महापालिकेच्या स्थायी समितीत सोमय्यांच्या आरोपांचे पडसाद

मुंबई - महापालिकेतील गैरव्यवहाराला "वांद्य्रातील साहेब‘, त्यांचा मेहुणा आणि सचिव जबाबदार असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. त्याचे तीव्र पडसाद सोमवारी महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. 

या आरोपांबाबत वस्तुस्थिती सांगा, अशी जोरदार मागणी करीत कॉंग्रेसच्या सदस्यांनी गोंधळ घालत बैठकीचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेस आणि शिवसेनेत जोरदार खडाजंगी झाली. या गोंधळातच 17 प्रस्ताव मंजूर करण्यात आले. खासदार सोमय्या यांनी केलेल्या आरोपांबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी आज स्थायी समितीची बैठक सुरू होण्यापूर्वी हरकतीच्या मुद्द्याद्वारे केली. त्यांनी ही मागणी करताच शिवसेना आणि कॉंग्रेस सदस्यांत जोरदार शाब्दिक चकमक झाली. स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी छेडा यांची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे संतप्त झालेल्या कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी कागदी फलक झळकावत "खासदार सोमय्या यांच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण द्या‘, "साहेब, त्यांचा मेहुणा आणि सचिव कोण याची माहिती द्या‘, अशा घोषणा केल्या. छेडा यांनी "मातोश्री‘कडे अंगुलिनिर्देश करताच शिवसेनेचे सदस्य संतप्त झाले. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक आणि छेडा यांच्यात खडाजंगी होऊन गदारोळ झाला. कॉंग्रेसविरुद्ध शिवसेना असा संघर्ष काही काळ दिसला. भाजपचे सदस्य मात्र हा गोंधळ पाहत होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad