४८ तासांत खडसेंचा राजीनामा घ्या, नाहीतर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोरच आमरण उपोषण - अंजली दमानिया - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 May 2016

४८ तासांत खडसेंचा राजीनामा घ्या, नाहीतर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोरच आमरण उपोषण - अंजली दमानिया

मुंबई / प्रतिनिधी, दि. ३० - महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. येत्या ४८ तासांत खडसेंचा राजीनामा घ्या, नाहीतर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यासमोरच आमरण उपोषणाला बसू, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिला आहे. दमानियांनी उपोषणाचा इशारा दिला असतानाच हॅकर मनीष भंगाळे याने खडसे-दाऊद कनेक्शनची सीबीआय चौकशी करा अशी मागणी केली. पुण्यात बंड गार्डन पोलीस ठाण्यात खडसेंविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. यामुळे महसूल मंत्री एकनाथ खडसे अडचणीत आले आहेत. 

महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी तापी सिंचन महामंडळातील सिंचनाची कामे मर्जीतल्या कंत्राटदारांना दिली आणि या सिंचनाच्या पैशातून जळगावात संत मुक्ताई नगर साखर कारखाना उभारण्यात आला. या सिंचन घोटाळ्यात खडसे १०० टक्के जबाबदार असून त्यांची चौकशी झालीच पाहिजे असे सांगतानाच या घोटाळ्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी त्यांना मदत केल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी येथे केला. तसेच येत्या ४८ तासांत खडसे यांचा राजीनामा न घेतल्यास किंवा त्यांच्या विरोधात कारवाई सुरू न केल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

अंजली दमानिया यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या सिंचन घोटाळ्याचा पर्दाफाश केला. तत्कालीन जलसंपदा मंत्री असताना खडसे यांनी तापी सिंचन महामंडळाची स्थापना केली होती. या महामंडळाच्या माध्यमातून कुर्‍हा वडोदा प्रकल्प २००८ रोजी सुरू करण्यात आला. त्याआधी १९९० पासून जीगाव प्रकल्प सुरू होता. जीगाव प्रकल्पाची किंमत आता सात हजार कोटी आहे. त्याचे काम अद्याप सुरू झाले नाही पण या प्रकल्पातून कंत्राटदाराला अमाप पैसा मिळाला. या प्रकल्पासाठी २००८ रोजी ८०० कोटींचे पाइप खरेदी करण्यात आले. प्रकल्पच सुरू झालेला नसताना हे पाइप खरेदी करण्याची गरजच काय होती, असा सवाल दमानिया यांनी केला. या सिंचन घोटाळ्याप्रकरणी आता एसीबीने खडसेंची चौकशी करावी अशी मागणी करतानाच सर्व यंत्रणांना या घोटाळ्याची माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.


दोन दिवसांत जमीन नावावर
सातोट गावात सर्व्हे क्रमांक २२५ असलेली ८८ एकर जमीन पत्नी मंदाकिनी, मुलगा निखिल, रोहिणी आणि जावई प्रांजल यांच्या नावावर घेतली. त्यानंतर या जमिनीचे पोटविभाग केले आणि दोन नावांवर करून घेतली. मंदाकिनी यांनी तलाठ्याला पत्र लिहिल्यानंतर तहसीलदाराने हे काम अवघ्या दोन दिवसांत केले. कायद्यानंतर जमीन घेतल्यानंतर १५ दिवस हरकती मागविण्यात येतात, पण या नियमाला खडसे प्रकरणात फाटा देण्यात आल्याचे दमानिया म्हणाल्या. जमीन नावे झाल्यावर एनएसाठी टाकली. आधी शैक्षणिक आणि नंतर निवासी वापर दाखवला. या जमिनीवर १०३७ प्लॉट पाडण्यात आले. अशा पद्धतीने खडसे यांनी नियमबाह्यपणे ४९ लाखांची जमीन ६३ कोटींची बनविली. केवळ ब्लॅक मनी व्हाइट करण्यासाठीच हा खटाटोप करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. २०१२ ते २०१४ मध्ये हे काम झाले पण या जमिनीची नोंद त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केली नसल्याचेही त्या म्हणाल्या. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दुरुस्तीची ४०० कोटींची कामे चार वर्षे खडसेंचे बंधू हरीश खडसेंना दिली. आता हरीश खडसेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कारखान्याची स्थापना कंत्राटदारांनी केली
मुक्ताई नगर कारखान्याची स्थापना इरिगेशनच्या दोन कंत्राटदारांनी केली होती. श्रद्धा ग्रुप ऑफ कंपनीचे शिवाजी जाधव आणि प्रसाद कन्स्ट्रक्शन या दोन कंत्राटदारांचा त्यात सहभाग होता. चंद्रकात वाघ आणि सुधीर ढाकणे या दोन इरिगेशनच्या अधिकार्‍यांनीही या कामात मदत केली. या कारखान्यात खडसेंची पत्नी, मुलगी आणि जावई संचालक मंडळावर आहेत. संचालक मंडळावर असलेल्या दोन कंत्राटदारांपैकी एक कंत्राटदार बाजूला झाला आहे. दुसराही बाजूला होणार असून हा कारखाना खडसेंना आपोआप हस्तांतरित करण्यात येणार असल्याचा दावाही दमानिया यांनी केला. कारखान्याला सिंचनाचा पैसा येत होता. या कारखान्याची संपूर्ण माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देण्यात येणार आहे. या घोटाळ्याप्रकरणी खडसे यांच्या कुटुंबीयांचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली.


‘‘खडसे कधीही सिंचनावर बोलले नाहीत. अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्याची कागदपत्रे खडसे यांना दिली पण त्यांनी फडणवीस नावाच्या आमदाराकडे ही कागदपत्रे देण्यास सांगितले. फडणवीस यांना कागदपत्रे दिल्यानंतर हा घोटाळा बाहेर आला. बुधवारपासून होणार्‍या उपोषणात हेमंत गवांदे आणि मनीष भंगाळेही सामील होणार असून या घोटाळ्याप्रकरणी मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहिणार आहे.’’

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad