मुंबई / प्रतिनिधी
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपाल विद्यासागर राव यांना भेटले. यावेळी भाजपाचे मंत्री एकनाथ खडसे यांचा राजीनामा आणि मुंबई महानगरपालिका बरखास्त करा या दोन मागण्याचे निवेदन मुंबई काँग्रेसने राज्यपालांना दिले.
यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले की, भाजपाचे मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. त्यांना या पदावर राहण्याचा अजिबात अधिकार नाही. त्यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप आणि त्यांचा कुविख्यात गुंड दाऊदशी असलेले संबंध तसेच पुणे येथील एमआयडीसी जमीन घोटाळा या सर्व प्रकरणात ते दोषी असून त्यांचा ताबडतोब राजीनामा घेतला पाहिजे. भाजपा सरकारने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. त्यांना मंत्री पदावरून तात्काळ हटविले पाहिजे, अशी आम्ही मागणी केली आहे.
ते पुढे म्हणाले की मुंबई महानगरपालिकेत प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. शिवसेना भाजपा मुंबई महानगरपालिका चालविण्यास पूर्णतः अपयशी ठरलेली आहे. ते फक्त एकमेकांवर आरोप करत आहेत. मुंबई महानगरपालिकेत अनेक घोटाळे झालेले आहेत. रस्ते घोटाळा, नाले सफाई घोटाळा, डम्पिंग ग्राउंड घोटाळा, टॅबलेट घोटाळा, असे अनेक घोटाळे बाहेर आलेले आहेत. पावसाळा तोंडावर आलेला असून अजून मुंबईतील नाल्यांची सफाई झालेली नाही, मुंबईकर निराश झालेले आहेत. मुंबईकरांना चांगल्या सोयी सुविधा देण्यात शिवसेना भाजपा सरकार संपूर्णपणे अपयशी ठरलेली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेतील हे सरकार ताबडतोब बरखास्त केले पाहिजे, अशी आमची दुसरी मागणी आम्ही राज्यपालांकडे सादर केलेली आहे.
या शिष्टमंडळामध्ये मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या सोबत माजी खासदार एकनाथ गायकवाड, आमदार असलम शेख, कालिदास कोळंबकर, अमिन पटेल, वर्षाताई गायकवाड, माजी आमदार चरण सिंग सप्रा, अशोक जाधव, मनपा विरोधी पक्षनेता प्रविण छेडा तसेच मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील व संदेश कोंडविलकर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment