मुंबई - आॅर्थर रोड तुरूंगामध्ये सोमवारी कैद्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली. धारदार शस्त्राने हल्ला चढविल्याने सहाजण जखमी झाले. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असून पुढील कारवाई सुरु असल्याची माहिती पोलीस आयुक्तांचे प्रवक्ते संग्रामसिंग निशाणदार यांनी दिली. याप्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कारागृहातील सर्कल क्रमांक ७ मध्ये बेकायदा शस्त्र बाळगणे, हत्या, चोरी, जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या विशाल चंद्रकांत आंबेकर, मुरुगन मनी नाडर, मोहम्मद मुद्दसर इस्माईल अन्सारी, राजा राजन नायर, अशोक कुमार ओमप्रकाश केवट, संतोष भिकाजी परब, सरवर मकसूद खान, जाकिर बशीर खान, सुलेमान मेहमुद पटेल, अरमान नफिज खान, सुनील नारायण निगेरी, सचिन पंढरीनाथ कणसे यांना ठेवण्यात आले आहे. सोमवारी सकाळी पावणेनऊ वाजण्याच्या सुलेमान पटेल व अरमान खान यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला. त्यावेळी बाजूला असलेल्या सरवर खानने मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुलेमानने चॉपरने त्याच्यावर वार केला. त्याला सरवरनेही त्याच पद्धतीने प्रत्यूत्तर दिले. त्यात अन्य बंदीही सहभागी झाले. अकस्मितपणे घडलेल्या या प्रकारामुळे येथील सुरक्षारक्षक भांबावून गेले. त्यांनी धोक्याचा सायरन वाजवून अन्य सुरक्षारक्षकांना बोलावून घेतले. सर्वांनी प्रयत्नाची शर्थ करीत कैद्यांना बाजूला केले. जखमी झालेल्या कैद्यांना तातडीने जे.जे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
No comments:
Post a Comment