मुंबई : प्रतिनिधी 28 मे 2016
बेरोजगारांना रोजगार मिळावा आणि सामान्य माणसाला सुविधा मिळावी या नावाखाली भाजपाने नमो टी स्टॉल उभारण्याची केलेली घोषणा म्हणजे शहराचे विद्रुपीकरण आणि सरकारी जागेवर अतिक्रमण करण्यासाठीचा छुपा डाव आहे, असा स्पष्ट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केला आहे. हा डाव वेळीच ओळखुन मुंबईकरांनी केलेल्या विरोधामुळे ही संकल्पना भाजपाची अधिकृत पक्ष संकल्पना नाही, अशी सारवासारव भाजपाच्या मुंबई अध्यक्षांना करावी लागली. तसेच भाजपाच्या एका नगरसेवकाने व्यक्तिगत पातळीवर मांडलेली ही संकल्पना असल्याचा थातूरमातूर खुलासाही भाजपाला करावा लागल्याची प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.
अशा प्रकारच्या योजना आणून आपल्या कार्यकर्त्यांची सोय लावण्याचा प्रयत्न या आधीही युती सरकारच्या काळात झाल्याचे सांगत अहिर म्हणाले की 'एक रुपयात झुणका भाकर' ही योजना अशाच पद्धतीने आणली गेली होती. मात्र या योजनाचा मुळ उद्देश बाजुला राहून पुढे या योजनेद्वारे मिळवलेले मोक्याच्या जागांवरील भुखंड शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांनी हडप केले. पुढे शिव वडा योजनेच्या माध्यमातून शिवसेनेने मुंबईत ठिकठिकाणी अनधिकृत स्टॉल उभारुन फुटपाथवर अतिक्रमण केल्याचा इतिहास तर ताजाच असल्याचा टोला लगावत मा. अहिर म्हणाले की, नमो टी स्टॉल ही योजनाही अशाच पद्धतीने रेटून नेण्याचा भाजपचा डाव होता. मात्र विरोधक, मीडिया आणि मुंबईकरांच्या विरोधामुळे सध्या तरी भाजपाला माघार घ्यावी लागली. तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची परवानगी न घेता नमो टी स्टॉलची योजना परस्पर जाहीर करणा्रया भाजपच्या नगरसेवकावर कारवाईची मागणीही त्यांनी यावेळी केली .
No comments:
Post a Comment