मुंबई, दि. 18 : वर्ल्ड बँकेच्या सहयोगातून राज्यातील 20जिल्ह्यांमध्ये कुपोषणमुक्तीसाठी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. टाटा ट्रस्टही या मोहिमेत सहभागी होत असून त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) महाराष्ट्रात कुपोषणमुक्तीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे यासंदर्भात काल महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमवेत वर्ल्ड बँक आणि टाटा ट्रस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. राज्य कुपोषणमुक्त करण्याच्या दृष्टीने या संस्थांचे कशा पद्धतीने सहकार्य घेता येईल, याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले.
कुपोषणमुक्तीसाठी सीएसआरमधून विविध कंपन्यांचे सहकार्य – पंकजा मुंडे
महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या की,राज्यातील प्रत्येक बालकाचे संपूर्ण पोषण व्हावे आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य कुपोषणमुक्त व्हावे, यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. संपूर्ण महाराष्ट्र राज्य कुपोषणमुक्त करण्याचे राज्य शासनाचे ध्येय आहे. यासाठी एकात्मिक बालविकास कार्यक्रमांतर्गत (आयसीडीएस) विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. राज्यात पोषण, स्वच्छता आणि आरोग्यदायी सुविधांनी युक्त अशा'स्मार्ट अंगणवाड्या' निर्माण करण्याच्या दृष्टीने महिला आणि बालविकास विभागामार्फत नियोजन करण्यात आले आहे. कुपोषणमुक्तीच्या मोहिमेत सीएसआर निधीतून सहयोग देण्यासाठी विविध कंपन्यांनीही तयारी दर्शविली आहे. सर्वांच्या सहकार्यातून राज्यातील प्रत्येक भाग कुपोषणमुक्त करू, असे त्यांनी सांगितले.
आरोग्य, पोषणविषयक संनियंत्रणासाठी अंगणवाडी सेविकांना मोबाईल
राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये वर्ल्ड बँकेच्या सहयोगातून कुपोषणमुक्तीसाठी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यापैकी धुळे,हिंगोली, जालना, नागपूर, परभणी, सांगली, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 8 जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका यांना महिला आणि बालकांचे आरोग्य, पोषण, लसीकरण आदींविषयी माहिती,सूचना यांची देवाणघेवाण करणे सुलभ व्हावे यासाठी स्मार्ट फोन किंवा टॅबलेट दिले जाणार आहेत. यासाठी वर्ल्ड बँकेच्या सहकार्याने‘आयसीडीएस – कॉमन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर’ विकसित करण्यात आले असून याद्वारे या संपूर्ण कार्यक्रमाचे संनियंत्रण केले जाईल. याशिवाय वर्ल्ड बँक आणि टाटा ट्रस्ट यांच्यामार्फत क्षमता बांधणी कार्यक्रमही राबविला जाईल. अंगणवाडी सेविकांपासून वरिष्ठ अधिकारी,कार्यकर्ते आदींना प्रशिक्षण देऊन बालकांच्या पोषणासाठी करावयाच्या प्रभावी उपाययोजनांची माहिती दिली जाईल.
बैठकीस महिला आणि बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर,प्रधान सचिव संजयकुमार, आयसीडीएसच्या आयुक्त विनिता वेद-सिंघल, डॉ. आनंद बंग, वर्ल्ड बँकेच्या ऑपरेशन ऑफिसर संगिता कॅरॉल पिंटो, मोहील काक, टाटा ट्रस्टच्या डॉ. स्मृती शर्मा, अपर्णा बी. गणेश,देबस्मिता पानी आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment