मुंबई । प्रतिनिधी - भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी असा आरोप केला आहे की महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराला बांद्राचा 'साहेब' व त्यांचा मेव्हणा तसेच त्यांचाच खासगी सचिव जबाबदार आहेत. मुंबई महानगरपालिकेत हजारो कोटींचा घोटाळा आहे. रस्ते घोटाळा, कचरा व्यवस्थापन घोटाळा, नाले सफाई घोटाळा, टॅबलेट वाटप घोटाळा आणि डम्पिंग ग्राउंड घोटाळा अशा अनेक गोष्टींमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. भाजपा आणि शिवसेना यांचीच मुंबई महानगरपालिकेत सत्ता असताना भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनीच महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार असल्याचे कबुल केलेले आहे. या भ्रष्टाचाराला त्यांनी नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे. ते म्हणाले की महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराला बांद्राचा 'साहेब' व त्यांचा मेव्हणा तसेच त्यांचाच खासगी सचिव जबाबदार आहेत.
मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले की भाजपा स्वतः महानगरपालिकेत शिवसेने सोबत सत्तेवर आहे. तेव्हा त्यांनी या विषयावर विस्ताराने सर्व मुंबईकरांना सांगावे. बांद्राचा साहेब, त्यांचा मेव्हणा व त्यांचा खासगी सचिव कोण व त्यांची नावे जाहीर करावीत. या भ्रष्टाचाराविषयी जर भाजपाला माहिती आहे, मग ते इतके दिवस गप्प का बसले, भ्रष्टाचार होत असताना भाजपा काय करत होती, असा आमचा सवाल आहे. भाजपाने या भ्रष्टाचाराविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी.
मुंबई कॉंग्रेसतर्फे आमची अशी मागणी आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी व भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी सगळ्यांची नावे जाहीर करावीत. दोषी व्यक्तींवर कारवाई करावी, मग तो कोणीही असो त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यावर एफ आई आर दाखल करून सविस्तर पोलीस कारवाई झाली पाहिजे आणि दोषी आढळल्यास त्यांना अटक करावी.
संजय निरुपम पुढे म्हणाले की मुंबईकरांना एक सुखकर जीवन पाहिजे आहे. चांगले रस्ते, स्वच्छ व मुबलक पाणी, स्वछ मुंबई, चांगले कचरा व्यवस्थापन आणि उत्तम नाले सफाई परंतु शिवसेना व भाजपा यामध्ये संपूर्ण अपयशी ठरली आहे. या मुंबई महानगरपालिकेत प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे मुंबईकरांचे जीवन जगणे असह्य झाले आहे. मुंबईत प्रदूषण वाढले आहे, तसेच महानगरपालिकेचे हॉस्पिटल्स शवागारा सारखे झालेले आहेत. सगळीकडे दुराचार माजला आहे. भाजपासुद्धा या संपूर्ण भ्रष्टाचारामध्ये शिवसेनेबरोबर सहभागी आहे. म्हणूनच ते फक्त शिवसेनेवर आरोप करून स्वतः बाजूला होतात आणि हे सगळे भाजपा गप्पपणे बघते आहे. भाजपाला खरच मुंबईकरांची चिंता असेल तर त्यांनी मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढावा व सगळ्यांची नावे जाहीर करावीत.
No comments:
Post a Comment