मुंबई शहर सात बेटांपासून बनले आहे. मुंबईची भौगोलिक परिस्थिती आणि मुंबईला सर्व बाजूने वेढलेल्या समुद्र किनाऱ्यामुळे पावसाळयाच्या दिवसात मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून मुंबईची तुंबापूरी होत असते. मुंबईमधील नालेसफाई झाल्याचे दावे केले गेले तरी नाल्यांमध्ये गाळ तसाच पडून असल्याने नाले तुंबून पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नाही. याचा त्रास सर्वच मुंबईकर नागरिकांना होत असतो. पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर याचे मोठ्या प्रमाणात परिणाम होऊन नागरिकांना अनेकवेळा नाईलाजाने घरी बसून राहावे लागते. मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये यावर्षी हि परिस्थिती बदलेल असा दावा देशमुख यांनी केला आहे.
मुंबईमधे 565 किलोमिटरचे नाले आहेत. 174 पाणी निचरा करणारे मार्ग आहेत. त्यापैकी 44 समुद्र सपाटीखाली, 124 समुद्र सपाटीवर आणि फ़क्त 6 भरती रेषेच्यावर आहेत. मुंबईमधे आधी 1 तासात 25 मिलीमिटरपर्यन्त पाउस पडला तर पाणी निचरा करणारी व्यवस्था होती. आता 50 मिलीमिटर पर्यन्त पाउसाचे पाणी वाहून नेणारी यंत्रणा उभारण्यात आली आहे. मुंबईच्या भौगोलिक परिस्थितीमुले यापेक्षा मोठी पाणी वाहून नेणारी व्यवस्था उभारणे शक्य नसल्याचे देशमुख यांनी सांगितले. मुंबईमधे एका तासात 50 मिलीमिटर पर्यंत पाउस पडला तर मुंबईमधे 15 ते 20 मिनिट पेक्षा जास्त पाणि साचणार नाही असे देशमुख यांनी सांगितले आहे. याच वेळी 50 मिलीमिटर पेक्षा जास्त पाउस पडला, समुद्रात 4 मिटर पेक्षा जास्त लाटा उसळल्या आणि त्याच वेळी पाउस पडत असला तर मात्र पाणी साचू शकते अशी शक्यता देशमुख यांनी वर्तवली आहे.
मुंबईमधे 270 कमी प्रमाणात पाणी साचणारी ठिकाणे असून या ठिकाणी 293 पंप सज्ज ठेवण्यात आले आहेत. या २७० ठिकाणी पाऊसाचे पाणी साचले तर वेळीच पाण्याचा निचरा होत नव्हता आता या ठिकाणी फक्त १५ ते २० मिनिटे पाणी साचेल त्यानंतर या ठिकाणी कामकाज किंवा ट्राफिक पुन्हा पूर्ववत होईल असे देशमुख म्हणाले. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचणारी ४० ठिकाणे होती याठिकाणाची संख्या कमी करण्यास पालिकेला यश आले असून आता हिंदमाता, सायन रोड नंबर 24, नायर हॉस्पिटल गेट या तिनच ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साचु शकते परंतू 31 में रोजी ब्रिटानिया पम्पिंग स्टेशन सुरु झाल्यावर या ठिकाणच्या पाण्याचा निचरा लवकर करता येऊ शकते असा दावा देशमुख यांनी केला आहे.
मुंबईमधे 565 किलोमिटर लांबीचे नाले आहेत. या नाल्यांच्या सफाईवरून पालिका वादग्रस्त ठरली आहे. नालेसफाईमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्याने महापालिकेला कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागली आहे. भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर सध्या नालेसफाईवर लक्ष ठेवले जात असल्याचे देशमुख यांनी सांगितले आहे. मुंबईमधील मीठी आणि वाकोला नदीची 76 टक्के, मोठ्या नाल्यांची 66 टक्के तर लहान नाल्यांची 35 टक्के सफाई करण्यात आली आहे. मागील वर्षी नालेसफाईमधे भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्याने आता टेंडर पॉलिसीमधे बदल करण्यात आले आहेत. जेवढा गाळ काढला तेव्हडेच पैसे कंत्राटदाराला दिले जाणार आहेत. कोणत्या वजन काट्यावर गाळ भरलेले ट्रक वजन करायचे याची यादीच महापालिकेने ठरवून दिली आहे. तसेच गाळ टाकण्यासाठी 9 ठिकाणे निश्चित केली असून याच ठिकाणी गाळ टाकावा लागणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
महापालिकेने ठरवून दिलेल्या वजन काट्यांवर गाळ भरलेले ट्रक वजन करतात का ? त्याची संख्या आणि गाळाचे प्रमाण किती ? याची माहिती संकलित करण्यासाठी वजन काट्यावर पालिकेचे 4 कर्मचारी 2 पाळ्यामधे कार्यरत ठेवले आहेत. नाल्यातूनकाढलेला गाळ डम्पिंगवर टाकाला जातो की नाही याची शहानिशा करण्यासाठी वजन काट्यापर्यंत घन कचरा व्यवस्थापन विभाग तर कचरा ठरवून दिलेल्या डंपिंगवर टाकला जातो की नाही याची शहानिशा दक्षता विभाग करणार आहे. मागीलवर्षी नालेसफाई करताना कंत्राटदार विहायकल ट्रयाकिंग सिस्टमचा वापर करून पालिकेला डेटा देत होते आता विहायकल ट्रयाकिंग सिस्टमवर पालिकेचा कंट्रोल असणार आहे. गाळ नेणाऱ्या ट्रकच्या चलनमधे अनेक फेर्यांच्या नोंदी असायच्या आता एक चलन एकाच फेरीसाठी वापरले जाणार आहे. नाले सफाईची गाळ वाहून नेणारा डंपर आता एकाच गटासाठीच वापरता येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
मुंबईमधील नालेसफाई होत नाही असा आरोप दरवेळी होत असतो. याचे स्पष्टीकरण देताना देशमुख यांनी नालेसफाईबाबत काही छायाचित्र दाखवली आहेत. यामध्ये नालेसफाई आधी नाल्यात गाळ आणि कचरा किती होता, नालेसफाई झाली तेव्हा त्या नाल्याचे चित्र कसे होते ते आणि पुन्हा दहा ते १२ दिवसानी याच साफ केलेल्या नाल्यात पुन्हा कचरा जमा झाल्याचे निदर्शनास आले आहे. साफ झालेल्या नाल्यामध्ये पुन्हा त्यानाल्या बाजूला राहणारे लोक कचरा टाकत असल्याने 1 जून पासून सुरु होणाऱ्या क्लीनअप मार्शलना नाल्यावर नियुक्त केले जाणार आहे. नाल्यात कचरा टाकणाऱ्या लोकांवर क्लीनअप मार्शल द्वारे कारवाई केली जाणार असल्याचा इशारा महापालिकेचे अतिरिक्त पालिका आयुक्त संजय देशमुख यांनी दिला आहे. मुंबईमधे 50 ते 60 लाख लोक झोपडपट्टीमधे राहतात झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी नाल्यात कचरा टाकू नका असे आवाहन महापालिकेच्यावतीने देशमुख यांनी केले आहे.
रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेने याआधी वेबसाईट सुरु केली होती आता १ जूनला महापालिका मोबाईल एप्लिकेशन सुरु करणार आहे. 1 जूनला सुरु केल्या जाणार्या ऍप्सद्वारे नागरिकांनी खड्ड्यांचे फोटो महापालिकेला पाठवायचे आहेत. फोटोमधील लॉन्गीटूड आणि ल्याटीटूडद्वारे खड्ड्यांची माहिती महापालिकेला मिळणार असून या माहितीच्या आधारे खड्डे बुजवले जाणार आहेत. रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवता यावेत म्हणून महापालिकेच्या प्रत्तेक परीमंडळाला 5 करोड या प्रमाणे 7 परिमंडळाला 35 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामधून खड्डे बुजवले जातील अशी माहिती देशमुख यांनी दिली आहे. पावसाळ्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली असल्याचा दावा करण्यात आला आहे. पावसाळयातील परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिका सज्ज झाली असली तरी मुंबईची भौगोलिक परिस्थिती पाहता पावसाळ्यात मुंबईची तुंबापुरी होणार नाही हा महापालिकेने केलेला दावा कितपत खरा आहे हे पावसाळ्यात समोर नक्कीच समोर येईल.
अजेयकुमार जाधव
मो.९९६९१९१६३
No comments:
Post a Comment