राज्यात नोकरी करणाऱ्या महिला आणि मुलींसाठी ३५ वसतिगृहे सुरू
उर्वरित त्वरित सुरू करण्यासंदर्भातील कार्यवाहीस वेग
निवासी शाळांत ८ वी नंतर सीबीएससी पॅटर्न राबविणार
मुंबई, दि. १० : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त मुलींसाठी आणि नोकरी करणा-या महिलांसाठी ५० शासकीय वसतिगृहे अत्यावश्यक सुविधांसह कार्यान्वित करण्याचा शासनाचा निर्धार आहे. यापैकी ३५ वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत. उर्वरित वसतिगृहे सुविधांसह त्वरित सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही करावी. तसेच, निवासी शाळेत ८ वी नंतर सीबीएससी पॅटर्न राबविण्याच्या कार्यास गती द्यावी, असे निर्देश सामाजिक न्याय आणि विशेष सहाय मंत्री राजकुमार बडोले यांनी यावेळी दिले.
मंत्रालयात राज्यातील शासकीय वसतिगृहे आणि निवासी शाळा याबाबतच्या समस्या आणि सद्य:परिस्थितीचा आढावा घेण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बडोले बोलत होते. बैठकीस सहआयुक्त विजया पवार, सहायक दिनेश भराटे आदीसह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. उर्वरित आश्रम शाळा त्वरित सुरू करण्यासंदर्भातील कार्यवाहीस गती द्यावी त्यासंदर्भातील येणा-या समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे बडोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.
गृहपाल या रिक्त पदावरील नेमणूक,आश्रमशाळेतील मुलींसाठी भोजन ठेका, अन्न-धान्य पुरवठा, स्टेशनरी, गणवेश, आर. ओ. प्लांटची जोडणी,शैक्षणिक तसेच इतर साहित्य खरेदी, मुलींसाठी विशेष निर्वाह भत्ता इत्यादी सोयींची या आश्रमशाळेत पूर्तता करण्यात यावी, असे सांगून बडोले यांनी या संदर्भातील समस्या जाणून घेतल्या. तसेच शासकीय निवासी शाळेत प्रयोगशाळा सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही करावी व ८ वी नंतर सीबीएससी पॅटर्न राबविण्यात यावा, शिक्षण सेवकांना मुदतीनंतर शिक्षक म्हणून नेमणूक करण्यासंदर्भात कार्यवाही करावी, असे निर्देशही बडोले यांनी संबंधित अधिका-यांना दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त सुरू करण्यात येणा-या मुलींच्या आश्रमशाळेपैकी ३५ शाळा भाडे तत्वावर इमारती घेऊन सुरू करण्यात आल्या आहेत. तर,अद्याप ९०६ विद्यार्थींनींचे प्रवेश झाले आहेत, अशी माहिती पवार यांनी यावेळी दिली.
No comments:
Post a Comment