मुंबई - दि.12 - खाजगी कोचिंग क्लास मालकांच्या फायद्यासाठी वैद्यकीय शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या साडेचार लाख विद्यार्थ्यांचे नुकसान वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
नीटचा वाद राज्यात सुरू असताना वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे हे मात्र याच कोचिंग क्लास मालकांच्या पैशांवर लंडन वारी करत होते असा आरोपही त्यांनी केला. या दौऱ्यात तावडें बरोबर कोचिंग क्लासचे मालकही होते. हा दौरा सरकारी नव्हता तो संपुर्ण खाजगी होता. वैद्यकीय शिक्षण घेवून इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अंधार करून तावडे मात्र लंडन वारी करत होते असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आघाडी सरकार असताना ऑल इंडीया मेडिकल कौंसिलच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या नीट पद्धती नुसारच मेडीकल प्रवेश परिक्षा घेतल्या होत्या. पण सरकार बदलल्यानंतर 3 जानेवारी 2015 ला वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी एक जीआर काढला. या जीआर नुसार मेडीकल प्रवेश परिक्षेतील निगेटीव्ह मार्कींग पद्धत रद्द करण्यात आली. त्यानंतर ९ मार्च 2015 रोजी आणखी एक जीआर काढण्यात आला. त्यात नीट ऐवजी अकरावी व बारावीच्या अभ्यासक्रमावर प्रवेश परिक्षा होतील. नीट पध्दतीने त्या घेतल्या जाणार नाहीत असा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय़ खाजगी कोचिंग क्लासेसच्या भल्यासाठीच घेतला गेला. कोचिंग क्लास चालकांना नीट नुसार अभ्यासक्रम शिकवणे अवघड झाले होते. शिवाय नीट अभ्यासक्रमात तुम्ही मेरीटमध्ये याला याची हमीही त्यांना देता येत नव्हती. म्हणून राज्य सरकारच्या ११ वी १२ अभ्यासक्रमा नुसार परिक्षा घेतली जाईल असा जीआर या कोचिंग क्लास चालकांच्या फायद्यासाठी काढला गेला होता असे मलिक म्हणाले. हे दोन्ही जीआर सरकारच्या संकेत स्थळावरूनही वैद्यकीय शिक्षण विभागाने काढून टाकले आहेत. या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी साडेचार लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य अधारात टाकले आहे. अशा मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यानीच राजीनामा घ्यावा किंवा त्यांना बडतर्फ करावे अशी मागणी यावेळी मलिक यांनी केली.
No comments:
Post a Comment