मुंबई 23 May 2016 - पश्चिम रेल्वेने विनातिकीट प्रवाशांविरोधात राबवलेल्या अभियानाने फुकटय़ांना चांगलाच दणका बसला आहे. एप्रिल महिन्यात विविध स्थानकांमध्ये राबवलेल्या या विशेष अभियानात विनातिकीट प्रवासी तसेच बेकायदेशीर सामान घेऊन जाणा-यांविरोधात केलेल्या कारवाईत तब्बल १२ कोटी ९ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
लोकलच्या मार्गावर बेकायदेशीर सामान घेऊन तसेच विनातिकीट प्रवास करणा-या प्रवाशांविरोधात राबवलेल्या मोहिमेत एप्रिल २०१६ मध्ये केलेल्या कारवाईत एकूण २ लाख ६१ हजार लोकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्यावर केलेल्या दंडात्मक कारवाईतून तब्बल १२ कोटी ९ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये बेकायदेशीर सामान घेऊन प्रवास करणे, दुस-याच्या आरक्षित तिकिटावर बेकायदेशीरपणे प्रवास करणे, विनातिकीट प्रवास करणे, अशा प्रवाशांविरोधात ही विशेष मोहीम राबवली होती.
यामध्ये दुस-याच्या आरक्षित तिकिटावर बेकायदेशीर प्रवास करणा-या २९९ जणांवर कारवाई करण्यात आली. रेल्वे परिसरातील १ हजार २१९ भिकारी आणि अनधिकृत फेरीवाल्यांना देखील रेल्वे हद्दीबाहेर काढण्यात आले. यापैकी १४४ जणांना तुरुंगात पाठवण्यात आले असून रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणा-यांविरोधात १९० मोहिमा घेण्यात येऊन १८४ जणांना अटक करून त्यांच्यावर रेल्वे कलमाअंतर्गत खटला चालवण्यात आला आहे.
याशिवाय महिलांच्या डब्यातून प्रवास करणा-या १२ वर्षावरील ९९ शालेय विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे अशा प्रकारे रेल्वेचे नियम तोडून प्रवास न करण्याचे आवाहन प्रवाशांना करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment