मुंबई, दि. 26 : पाणी टंचाईवर मात करण्यासाठी राज्य शासन विविध उपाय योजना केल्या जात आहेत. शासनाच्या या उपक्रमांना विविध संस्थांचे सहकार्य मिळत असून भारतीय उद्योजक महासंघ (सीआयआय) ने विकसित केलेल्या ‘वॉटस्कॅन’ (Watscan) चा उपयोग मराठवाडा आणि विदर्भातील एकूण 10 जिल्ह्यांमध्ये केला जाणार आहे. या मशिनचा प्रायोगिक तत्त्वावर सुरु केलेला उपयोग टंचाई निवारणासाठी महत्वाचे पाऊल ठरणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
विधानभवनात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय औद्योगिक महासंघाच्या शिष्टमंडळासमवेत बैठक संपन्न झाली. त्यावेळी श्री. फडणवीस बोलत होते. या बैठकीस सीआयआय दक्षिण विभागाच्या महाराष्ट्र स्टेट कौन्सिलचे चेअरमन सुनील खन्ना,वाइस चेअरमन ऋषीकुमार बागला, विभागीय संचालक डॉ. सौगत मुखर्जी, सीआयआय त्रिवेणी वॉटर इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक डॉ. कपील नेरुला, सोहराबजी गोदरेज ग्रीन बिझनेस सेंटरचे कार्यकारी संचालक एस. रघुपती आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात सिंचन वाढ करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विशेषत: विदर्भातील अकोला,बुलढाणा, अमरावती, वाशिम आणि यवतमाळ व मराठवाड्यातील बीड,औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद आणि लातूर या एकूण दहा दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची निवड करुन या भागात जलस्त्रोतांचा शोध,पाण्याची साठवणूक आणि नियोजन करण्यासाठी सीआयआयने विकसित केलेल्या ‘वॉटस्कॅन’ या आधुनिक तंत्रज्ञानयुक्त मशिनचा वापर प्रायोगिक तत्त्वावर सुरु करावा, असे फडणवीस यांनी सांगितले. या प्रकल्पाची निवड केलेले दहा जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री यांच्या नियंत्रणाखाली अंमलबजावणी केली जाणार आहे.
फडणवीस म्हणाले की, या प्रकल्पाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जलसंपदा विभागातील अधिकारी आणि भारतीय औद्योगिक महासंघाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात यावी. असे निर्देशही फडणवीस यांनी यावेळी दिले.
पुण्यातील ‘वॉटस्कॅन’चा पहिला यशस्वी प्रयोग
भारतीय औद्योगिक महासंघाच्या वतीने निर्मित वॉटस्कॅन या मशीनचा महाराष्ट्र राज्यातला पहिला प्रयोग पुणे येथे प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात आला असून तो पूर्णपणे यशस्वी ठरला आहे,अशी माहिती सीआयआय त्रिवेणी वॉटर इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक डॉ. कपील नेरुला यांनी यावेळी दिली.
No comments:
Post a Comment