मुंबई / प्रतिनिधी - भारतीय जनता पार्टीचे खासदार किरीट सोमय्या यांच्याविषयी खोटी व बदनामीकारक बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल दैनिक सामना या वृत्तपत्राने ४८ तासात बिनशर्त माफी मागून त्याला वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर बातमीइतकीच प्रसिद्धी द्यावी, अन्यथा या वृत्तपत्राच्या विरोधात कायदेशीर कारवाई करू, असा इशारा कायदेशीर नोटिशीद्वारे देण्यात आला आहे.
दै. सामना या वृत्तपत्राने रविवार, १५ मे २०१६ रोजीच्या अंकात पहिल्या पानावर 'बिनबुडाच्या किरीट सोमय्यांचा घोटाळा' अशा शीर्षकाची बातमी प्रसिद्ध केली आहे. त्या संदर्भात खा. सोमय्या यांच्या वतीने ध्रुव लिलाधर आणि कंपनी या सॉलिसिटर फर्मने सामनाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
या नोटिशीत म्हटले आहे की, सांताक्रूजमधील एका बांधकामाच्या संदर्भात या वृत्तपत्राने खोटी व बदनामीकारक बातमी प्रसिद्ध केली आहे. प्रत्यक्षात खा. सोमय्या व त्यांच्या कुटुंबियांचा मेधा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या कंपनीशी अथवा मुंबईतील अन्य कोणत्याही झोपडपट्टी पुनर्वसन अथवा पुनर्विकास प्रकल्पाशी संबंध नाही. या बातमीला अशी ठळक प्रसिद्धी देण्यापूर्वी संबंधित वृत्तपत्राच्या संपादकाने अथवा बातमीदाराने खा. सोमय्या यांच्याशी संपर्क साधून वस्तुस्थितीची शहानिशा करण्याची तसदी घेतली नाही. अर्थातच खा. सोमय्या यांची बदनामी करण्यासाठीच बातमीत आरोपांना प्रसिद्धी देण्यात आली.
कायदेशीर नोटिशीमध्ये स्पष्ट मागणी केली आहे की, सामनाने या बातमीबद्दल ४८ तासात खा. सोमय्या यांची माफी मागावी व त्याला वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर मूळ बातमीएवढ्याच जागेत व तशीच ठळकपणे प्रसिद्धी द्यावी. अशी खोटी व बदनामीकारक बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल संबंधित बातमीदार तसेच संपादक यांच्यावर कारवाई करावी व त्याची माहिती खा. सोमय्या यांना लेखी कळवावी. असे केले नाही तर दै. सामना तसेच संपादक व बातमीदारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
No comments:
Post a Comment