मुंबई : प्रतिनिधी - बेस्ट कर्मचाऱ्यांना ४० टक्के वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव बेस्ट वर्कर्स युनियनने बेस्टचे महाव्यवस्थापकांना दिला आहे. बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या वेतन कराराची मुदत ३१ मार्च २०१६ रोजी संपली आहे. त्यामुळे नव्या वेतन करारात सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगारवाढ देण्याची मागणी युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.
याआधी २००६ ते २०११ आणि सन २०११ ते २०१६ या कालावधीसाठीचा वेतन करार २८ एप्रिल २०१२ रोजी झाला होता. त्यामुळे यंदाचा वेतनकरार वेळेत करण्याची मागणी युनियनने केली आहे. राव म्हणाले की, बेस्ट उपक्रमाने २००७ सालापासून यापूर्वीचा करार होईपर्यंत रोजंदारी पद्धतीने व कनिष्ठ श्रेणी निर्माण करून समारे ११ हजार ५०० कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. या कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करताना त्यांची मातृश्रेणी इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे ७ हजार ९३० करता आली नाही. नव्या कनिष्ठ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना केवळ ५ हजार ४३० मातृश्रेणी ठरवण्यात आली.
परिणामी, या कर्मचाऱ्यांना २ हजार ५०० रुपयांचा फटका बसला. त्यामुळे नव्या वेतन करारात या कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावत दूर करण्याची मागणी राव यांनी प्रशासनाकडे केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे युनियनने उपक्रमातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन १५ हजार ३०० करण्याची मागणी केली आहे. शिवाय बसवाहक व बासचालकांचे किमान मूळ वेतन अनुक्रमे १६ हजार ६०० व १७ हजार २०० रुपये करण्याची मागणी युनियनने प्रस्तावात केली आहे.
No comments:
Post a Comment