मुंबई, दि. २० : जलयुक्त शिवार अभियानासाठी मागील वर्षी निवडण्यात आलेल्या ६ हजार २०२ गावांमध्ये कोणत्याही परिस्थितीत जलसंधारणाची उर्वरित कामे पूर्ण करुन येत्या पावसाळ्यात ही सर्व गावे जलस्वयंपूर्ण होतील यादृष्टीने नियोजन करण्यात यावे, असे निर्देश ग्रामविकास आणि जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह कृषी आणि जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. याशिवाय चालू वर्षासाठी निवडण्यात आलेल्या ५ हजार २५४ गावांमधील जलसंधारणाच्या कामांनाही गती देण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.
मंत्री पंकजा मुंडे यांनी आज मंत्रालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सर्व अधिकाऱ्यांशी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख उपस्थित होते. मंत्री पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या की, जलयुक्त शिवारची कामे करत असताना ती तांत्रिकदृष्ट्या निर्दोष होतील यावर भर देण्यात यावा. शासनाने जलयुक्त शिवार अभियानासाठी आतापर्यंत साधारण २ हजार ६०० कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे वितरित केला आहे. या योजनेसाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडून दिला जाणार नाही. राज्याला दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीवर प्राधान्याने लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
नदी पुनरुज्जीवनासाठी १२२ कोटी रुपयांचा निधी वितरीत
याप्रसंगी नदी पुनरुज्जीवनासाठी कार्यक्रम, साखळी सिमेंट नालाबांध कार्यक्रम,पाणंद रस्त्यांची कामे, मागेल त्याला शेततळे या योजनांचाही आढावा घेण्यात आला. नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमासाठी राज्यातील १६ जिल्ह्यांना १२२ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. यातून नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावा. मागेल त्याला शेततळे योजनेसाठी पहिल्या टप्प्यात ५२ हजार ५०० शेततळी घेण्यात येत आहेत. या योजनेला गती देऊन शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी व्यापक प्रयत्न करावेत, असे मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.
४ हजार ६०० गावे होणार जलस्वयंपूर्ण
या व्हीडीओ कॉन्फरसिंगमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत राज्यातील २८०० गावांमध्ये आराखड्यानुसार जलयुक्त शिवारची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे पाऊस झाल्यानंतर ही सर्व गावे जलस्वयंपूर्ण होतील, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार जूनपर्यंत राज्यातील अजून १८०० गावांमध्ये आराखड्यानुसार जलसंधारणाची कामे १०० टक्के पूर्ण केली जातील. त्यामुळे ही सर्व एकूण साधारण ४ हजार ६०० गावे येत्या पावसाळ्यात जलयुक्त होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
जलयुक्त शिवाराची १ लाख ७३ हजार कामे पूर्ण
बैठकीत जलसंधारण विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात मागील वर्षी निवडण्यात आलेल्या ६ हजार २०२ गावांमध्ये जलसंधारणाची साधारण १ लाख ७३ हजार २४१ कामे पूर्ण झाली आहेत. याशिवाय ३५ हजार ८८८ कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांमधून साधारण ६१ लाख ८ हजार ९७० टीसीएम इतकी पाणीसाठा क्षमता निर्माण झाली आहे. तसेच यातून साधारण ३ लाख ९ हजार ३२५ हेक्टर इतकी संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.
No comments:
Post a Comment