मुंबई, दि. 26 : धनगर समाजास अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यासंदर्भात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई यांच्यामार्फत संशोधनाचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. तिसऱ्या आणि महत्त्वाच्या टप्प्याचे काम सुरु असून शास्त्रीय संशोधन पद्धतीने पारदर्शक अहवाल तयार करुन धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यासंदर्भात शासन कटिबध्द आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.
धनगर समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री राम शिंदे, आमदार अनिट गोटे, रामराव वडकुते, रामहारी रुपनवर, माजी आमदार रमेश शेंडगे, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे,सामान्य प्रशासन विभागाचे सचिव प्रमोद नलावडे, धनगर समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यासंदर्भात संशोधनाचे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे काम अंतिम टप्प्यात आहे. या संशोधन अहवालात धनगर समाजाच्या संघटनांनी जे संशोधन केले आहे, त्याचा आणि लोकप्रतिनिधींचे मत या सर्व बाबींचा अभ्यास करून शास्त्रीय संशोधन पध्दतीने सर्वसमावेशक पारदर्शक अहवाल तयार करून धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
सोलापूर येथील विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून कायदेशीर बाबींचा अभ्यास करून याचा निर्णय घेण्यात येईल आणि 31 मे ला शासकीय पातळीवर अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यासंदर्भातील आदेश निर्गमित करण्यात येईल, असे आश्वासन देऊन फडणवीस पुढे म्हणाले की, शेळी-मेंढीच्या पालन-पोषण आणि उद्योगवाढीसाठी अभ्यास करण्यासंदर्भात आमदार अनिल गोटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून समितीच्या अहवालावर अभ्यास करून यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीत मेंढी चराईबाबत शासनाने नेमलेल्या समितीने सर्व समावेशक अहवाल दिलेला आहे तो अहवाल तात्काळ स्वीकारुन त्यानुसार मेंढपाळांना चराई कुरणे व सोयी उपलब्ध करुन द्याव्यात,मेंढपाळांच्या मुलांकरिता आश्रमशाळा सुरु करावी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळास अनुदान उपलब्ध करुन द्यावे, मल्हारराव होळकर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करुन धनगर समाजाला स्वतंत्र व मुबलक अर्थसहाय्य उपलब्ध करुन द्यावे, धनगर समाजातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणे, अहिल्यादेवी होळकर आणि मल्हारराव होळकर यांच्यावर साहित्य निर्मिती करणे, तसेच शेळी-मेंढी पालनाला कृषी उद्योगाचा दर्जा देणे, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यात मुलींचे वसतिगृह उभारणे, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना अहिल्यादेवी होळकर या नावाने पुरस्कार देणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
No comments:
Post a Comment